Gavakadachibatmi
सहाय्यक संपादिका मंगला भोगे
अचलपूर, : जानकीबाई कन्या हायस्कूल, अचलपूर येथे किशोरवयीन मुलींसाठी ‘वयात येताना होणारे बदल’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात विद्यार्थिनींना वयात येताना होणारे शारीरिक, मानसिक व भावनिक बदल याविषयी सखोल माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा अमरावतीच्या कार्यकर्त्या मंजू वासानिक यांनी मुलींशी संवाद साधला. त्यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक, किशोरवयातील आरोग्य आणि स्वच्छता, तसेच ‘चांगला स्पर्श व वाईट स्पर्श’ याविषयी संवेदनशील आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारत सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निस्ताने होत्या. तसेच सर्व वर्गशिक्षक व शिक्षिकांचीही उपस्थिती होती. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शाळेने विद्यार्थिनींना आरोग्यदायी, आत्मविश्वासपूर्ण आणि सजग जीवन जगण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
