महिला व युवकांच्या सक्षमीकरणावर नंदिनीताई टारपे यांचे मार्गदर्शन
बोधडी : किनवट तालुक्यातील बोधडी गावात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जननायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्लीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष नंदिनीताई टारपे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नंदिनीताई टारपे यांनी आदिवासी समाजातील महिला आणि युवकांच्या प्रगतीवर विशेष भर दिला. महिलांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि संघटनशक्तीच्या बळावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, तर युवकांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, संघर्षातून आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक प्रगती, सामाजिक एकता, महिलांचे सक्षमीकरण आणि युवकांना योग्य दिशा देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बिरसा मुंडांच्या संघर्षातून समाजाला प्रेरणा
भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक, जननायक आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलिहातू येथे जन्मलेल्या बिरसा मुंडांनी ब्रिटिश सत्तेचे शोषण, अन्यायकारक जमीनव्यवस्था आणि आदिवासींच्या पारंपरिक हक्कांवरील अतिक्रमणाविरुद्ध संघर्ष उभारला. त्यांच्या नेतृत्वाखाली 'उलगुलान' अर्थात महान उठावाने ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान दिले.
अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जल, जंगल, जमीन, आदिवासी अस्मिता, स्वाभिमान आणि समाजाच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. ९ जून १९०० रोजी रांची कारागृहात त्यांचे निधन झाले. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा पुढील पिढ्यांनी जपावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आदिवासी पारंपरिक कला, संस्कृती, रूढी आणि वारशाचे जतन करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. माजी सरपंच पोटे यांच्या मुलाचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश गवले यांनी केले. आदिवासी युवा वर्गाच्या पुढाकाराने आणि बोधडी ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे पाटील, उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मारुती दिवशे, माजी सरपंच भारत शेळके, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ डवरे, माजी सदस्य बाळू ताटी कुंडलवार, गंगाधर तोटरे, बालाजी शेळके, गजू चिरमाडे, माणिक पेंदोर, शैलेश मेश्राम, राज बोईनवाड, नामदेव कोतवाल, यशवंत कांबळे, विजय नामदे, किसन डोंगरे, सर ढाले मामा, मंगल मिरासे, राहुल मेश्राम, अर्जुन लाकडे, तुकाराम मुरमुरे, सुरेश गवले, मनोज वानोळे, युवा नेते बालाजी टारपे, कोठुळे, गणेश गवले, विजय टारपे, आदित्य जटाळे, भगवान कोतवाल, आकाश शेळके, बाळू झाडे, बळी पोटे, गणेश डाके, गणेश मुरमुरे, राजू टारपे, वैभव भिसे, राजू कानवटे, धनराज भूरके, विजय वाळके, गणेश कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थ, युवक, महिला आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती उत्सवात सहभागी झाले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या एकतेचा, सांस्कृतिक जतनाचा आणि सामाजिक प्रगतीचा संदेश देण्यात आला.

