कानडी येथील साठवण तलाव अन्यत्र हलविण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध!
घोटा येथील सर्वेक्षण तातडीने थांबविण्याची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
मूर्तिजापूर : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी येथे प्रस्तावित असलेला साठवण तलाव अन्यत्र हलविण्याच्या हालचालींना प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. कानडी येथील साठवण तलावाचे ठिकाण कायम ठेवून घोटा येथील सुरू असलेले सर्वेक्षण तातडीने थांबवावे, अशी मागणी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. चिन्मय वाकोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा प्रकल्प परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कानडी येथे साठवण तलाव उभारण्यासाठी यापूर्वी तांत्रिक सर्वेक्षण, नकाशे, डिझाइन तसेच कालव्यांच्या भूसंपादनासंदर्भातील प्रक्रिया पुढे गेलेली असताना अचानक साठवण तलाव घोटा येथे हलविण्याच्या हालचाली का सुरू झाल्या, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
कानडी परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सिंचनाचे पाणी अन्यत्र वळविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका निवेदनकर्त्यांनी मांडली आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रचलित कायद्यानुसार जमिनीच्या बाजारभावाच्या आधारे योग्य व न्याय्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विराहित येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिराबाबत ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन मंदिराचे संरक्षण करण्यासाठी योग्य पर्याय शोधण्यात यावा. मात्र, मंदिराच्या संरक्षणाचा प्रश्न आणि साठवण तलावाचे ठिकाण बदलण्याचा निर्णय या दोन बाबींची गल्लत करू नये. मंदिराचे संरक्षण करून कानडी येथेच प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी निवेदनातून स्पष्ट केली आहे.
पाच प्रमुख मागण्या मांडल्या
१. कानडी येथील प्रस्तावित साठवण तलाव कायम ठेवण्यात यावा.
२. साठवण तलाव कोणत्याही परिस्थितीत रद्द अथवा अन्यत्र स्थलांतरित करू नये.
३. प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला देण्यात यावा.
४. कानडी येथील साठवण तलावाच्या कामाला तातडीने सुरुवात करावी.
५. तलाव घोटा येथे हलविण्याच्या हालचालींमागील कारणांची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष करून साठवण तलाव अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेतल्यास कानडी, विराहित व परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रसंगी आमरण उपोषणही करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनकर्ते : प्रकल्पग्रस्त शेतकरी, कानडी व विराहित तसेच शेतकरी कन्या प्रिया अक्षय राऊत (लोडम), युवती प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती संघटना.
कानडी परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नावर आता जलसंपदा विभाग काय भूमिका घेतो, याकडे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

