जिल्हा विशेष प्रतिनिधी भीमराव खंडारे
खामगाव – शाहू, फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा जाज्वल्य वारसा जनमानसात रुजविण्यासाठी सुरू असलेल्या “कही हम भुल न जाये” अभियानांतर्गत “चालता-बोलता आंबेडकर मेळा” या माध्यमातून घानेगाव येथे पार पडलेली ॲड. अतुल पाटील यांची जाहीर सभा अभूतपूर्व उत्साहात, जल्लोषात आणि क्रांतिकारी वातावरणात संपन्न झाली.
नागपूर येथील आंबेडकरी चळवळीचे परखड अभ्यासक, ज्वलंत वक्ते तथा समाजप्रबोधनकार ॲड. अतुल पाटील यांनी आपल्या जाज्वल्य वाणीने उपस्थित जनसमुदायात विचारांची ठिणगी पेटवत संविधान, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवमुक्तीचा विचार प्रभावीपणे मांडला. त्यांनी अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांवर कठोर शब्दांत प्रहार करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या मंत्राने समाज परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले.
घानेगाव येथील बुद्ध विहार परिसरात पार पडलेल्या या सभेला युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आंबेडकरी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर जयभीम, संविधानाचा विजय असो, बाबासाहेब अमर रहे अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता. सभास्थळी उपस्थित जनसमुदायाचा उत्साह ओसंडून वाहत होता.
उन्ह, वारा, पाऊस यांची पर्वा न करता गावोगावी फिरून समाजजागृती करणाऱ्या ॲड. अतुल पाटील व त्यांच्या टीमच्या संघर्षशील कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. समाजहितासाठी जीवाचे रान करणाऱ्या या योद्ध्यांच्या कार्यामुळे परिवर्तनाची नवी लाट निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांतून व्यक्त करण्यात आली.
ही सभा केवळ एक वैचारिक कार्यक्रम न ठरता, सामाजिक क्रांतीची ठिणगी पेटवणारा आणि नवसंघर्षाची प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाला ॲड.अश्विनी मुन मॅडम, ॲड.डि.एम.भगत, इंजि.श्रिकांत वानखेडे, बबनराव कटारे, रविंद्र वाकोडे, योगेश सिरसाठ, नितीन मोरे,शैलेश पैठणकर,अनिल धुंदे,मनोज इंगळे, कैलास वानखडे, योगेंद्र इंगळे, वैभव खंडारे, विशाल खंडारे, सिद्धार्थ इंगळे, कुंदन इंगळे, मिलिंद इंगळे इतर गावकरी मंडळी उपस्थित होती.
