छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 1317 प्रकरणे निकाली

 


शेतकरी व गरीब वर्गाकरिता महसूल विभाग आपल्या दारी - चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री


Editor -Milind jamnik 

मुर्तिजापूर - महाराष्ट्र शासनाच्या 17 फेब्रुवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 अंतर्गत मुर्तिजापूर तालुक्यातील तिसरे शिबीर लाखपुरी येथील तीर्थक्षेत्र लक्षेश्वर संस्थान येथे 10 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले.

या शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले. शिबिरास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी, जिल्ह्यातील सुमारे 25 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून उर्वरित कालावधीत आणखी 25 हजार लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला. आमदार हरीष पिंपळे यांनी महसूल विभागाच्या 48 निर्णयांमुळे नागरिकांची कामे वेगाने होत असल्याचे सांगत प्रशासनाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले. आमदार रणधीर सावरकर यांनीही प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करत योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर दिला.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी शासनाची संकल्पना स्पष्ट करताना, शेतकरी व गरीब कुटुंबांपर्यंत सर्व योजना घरपोच पोहोचविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

शिबिरात विविध विभागांचे सुमारे 30 स्टॉल उभारण्यात आले होते. महसूल, भूमी अभिलेख, पुरवठा, संजय गांधी योजना, महिला व बालविकास, आरोग्य, महावितरण, परिवहन, सेतू केंद्र, आधार आदी विभागांनी नागरिकांना सेवा दिल्या. डिजिटल 7/12, ई-फेरफार, ई-मोजणी, अभिलेख दुरुस्ती, प्रमाणपत्र वितरण आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या शिबिरात कूळ जमीन प्रकरणे (2), फेरफार (174), 7/12 दुरुस्ती अर्ज (29), डिजिटल 7/12 (181), 8-अ उतारे (181) व प्रमाणपत्रे (638) अशा एकूण 1317 प्रकरणांवर कार्यवाही पूर्ण करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार वसंत खंडेलवाल, नगराध्यक्ष हर्षल साबळे, सरपंच राजू कैथवास यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास कल्हाळे यांनी तर प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी आभार प्रदर्शन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post