निलेश रामगावकर / जिल्हा प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे :- आमदार प्रताप अडसड यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अल्पावधीतच भाजीपाल्याच्या लिलावाची वेळ बदलून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांचे मनापासून आभार मानले.
आमदार प्रताप अडसड यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची योग्य वेळी विक्री करता येणार असून, धामणगाव शहराच्या बाजारपेठेला नवसंजीवनी मिळणार आहे. स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांना चालना मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.-डॉ. अर्चना अडसड-रोठे (आक्का)
मध्यरात्री होणाऱ्या भाजीपाल्याच्या लिलावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे लिलावाची वेळ बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार प्रताप अडसड यांच्याकडे केली होती, जी आज पूर्ण करण्यात आली. आज सकाळी धामणगाव रेल्वे येथील आठवडी बाजारात डॉ. अर्चना अडसड-रोठे (नगराध्यक्ष) यांच्या हस्ते, तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व व्यापाऱ्यांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष बंडूभाऊ मुंदडा, गटनेते नरेंद्र चौधरी, महिला व बालकल्याण सभापती अंजली मार्वे, पाणीपुरवठा सभापती विलास बूटले, नगरसेविका सीमाताई बागडे, प्रियंका जवंजाळ, नगरसेवक दर्शन राठी, गोपाल द्विवेदी, अंशुलेश बडगैया तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते. या निर्णयाचे आठवडी बाजारातील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.



