प्रमुख मार्गदर्शकांनी माहिती अधिकाराचे महत्व दिले पटवून
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर अमरावती
धामणगाव रेल्वे : मानवाच्या जीवनातील अतिशय महत्वाचा कायदा म्हणजे माहिती अधिकार. नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी 'माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, महाराष्ट्र' यांच्या वतीने विशेष मार्गदर्शन तसेच जनजागृती शिबिराचे आयोजन दि. १८ एप्रिल, २०२६ रोजी शेतकरी भवन येथे करण्यात आले होते.
या भव्य कार्यशाळा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुभाष बसवेकर (पनवेल मुंबई) निलेश केवट अध्यक्ष-पिंपरी चिंचवड शहर पुणे. पेंटर बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे प्रशांत मेश्राम (अकोला) सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश वानखडे धामणगाव रेल्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करून प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात केली.
या कार्यक्रमात अकोला, अमरावती, मोर्शी, वरुड, यवतमाळ, नागपूर, दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार बंधू सह शेकडो च्या वर नागरिकांनी हजेरी लावली होती. या भव्य कार्यशाळा प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रमात माहिती अधिकारी २००५, सेवा हमी कायदा २०१५, दप्तर दिरंगाई कायदा २००५, कामगार कायदा व शेतकऱ्यांचे विषय याबाबत निलेश केवट, सुभाष बसवेकर तसेच प्रशांत मेश्राम यांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच माहिती अधिकार कायद्याचा वापर करताना नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण या कार्यक्रमातून करण्यात आले.
माहिती अधिकार २००५ या कायद्याची जनजागृती करण्याचे काम हे शासनाचे असताना देखील प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. मात्र धामणगाव सारख्या शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन यांच्या वतीने करण्यात आल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक केल्या जात आहे. सदरच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता धामणगाव शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता मनोज सापेकर, धीरज भैसारे, शेख नासिर शेख, विनोद कोष्टी, गोवर्धन ढगे, कैलास ढोले, अमित राजूरकर, चंद्रपाल रंगारी तसेच संयोजक यांनी विशेष मेहनत घेतली.
सदरच्या कार्यक्रमाला पुरुष वर्गासह महिलांची सुद्धा उपस्थिती मोठ्या प्रमाणात असून संपूर्ण दिवसभर मार्गदर्शन व्यक्त्यांकडून मिळणारे ज्ञान नागरिकांनी आत्मसात केले, शेवटी सामूहिकरीत्या राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन निकिता राऊत तर आभार प्रदर्शन नागेश नेमारे यांनी केले.

