भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांची परतवाडा पोलीस ठाण्यास भेट
परतवाडा | उपसंपादक संतोष भालेराव | २० एप्रिल २०२६
परतवाडा येथे उघडकीस आलेल्या गाजलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली. भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज परतवाडा पोलीस ठाण्यास भेट देत या प्रकरणाचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी संबंधित ठाणेदारांकडून संपूर्ण तपासाची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. पोलीसांकडून तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत उघडकीस आलेले धागेदोरे तसेच पुढील कारवाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पत्रकारांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच, ज्या नागरिकांकडे किंवा पीडित कुटुंबीयांकडे या प्रकरणाशी संबंधित कोणतीही अतिरिक्त माहिती असेल, त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पुढे येऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
“पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. सत्य बाहेर येण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणामुळे परतवाडा शहरासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनाकडून तपास अधिक वेगाने सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणाकडे आता राजकीय आणि सामाजिक पातळीवरही गांभीर्याने पाहिले जात असून पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


