राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक दादारावजी तिवाडे यांचे निधन.

 




तळेगाव दशासर :- स्थानिक  प्रभाग क्र. एक येथील रहिवासी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक स्व .दादारावजी तिवाडे गुरुजी यांचे दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी नागपूर येथे दुःखद निधन झाले.

१९९५ चा तो काळ अमरावती जिल्ह्यात ‘आनंददायी शिक्षण’ प्रत्येक शाळेत रुजत होते. त्याच काळात दादारावजी तिवाडे गुरुजी बाहुली नाट्याचा अनोखा प्रयोग घेऊन शिक्षण क्षेत्रात आले. त्यांच्या या सर्जनशील उपक्रमाने अनेक नवोदित शिक्षकांना प्रेरणा दिली अमरावती जिल्ह्यात आनंददायी शिक्षण उपक्रमात  कापूसतळणी येथे नंतर महाराष्ट्र सरकारने आनंददायी शिक्षण महाराष्ट्र शासनाने स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रभर त्यांनी बाहुली नाट्य, एकपात्री प्रयोग आणि विविध कलात्मक माध्यमांतून त्यांनी ‘आनंदातून शिक्षण’ ही संकल्पना जिवंत केली.

बाहुली नाट्यकार, नाट्यलेखक, रंगकर्मी आणि एकपात्री अभिनेता अशी त्यांची बहुआयामी ओळख होती. त्यांच्या दमदार, प्रभावी आवाजातील नाट्यप्रयोग आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील आणि जिद्दी शिक्षक ,मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हा त्यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव होता.

त्यांच्या निधनाने शिक्षण आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेली प्रेरणा सदैव आपल्या सोबत राहील.

Post a Comment

Previous Post Next Post