अपयशातूनच यशाचा मार्ग - प्रा. विठ्ठल कांगणे

 



स्पर्धा परीक्षा आणि आजचा विद्यार्थी ” विषयावर व्याख्यान ; हजारो विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती



यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव : प्रा. विठ्ठल कांगणे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन


Editor Milind jamnik 

मूर्तिजापूर - अपयश हेच मानवाला यशस्वी बनवू शकते. अपयशाकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता, त्यातून शिकून पुढे जाण्याची जिद्द ठेवली तर यश निश्चित मिळते, असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले. जी. के. अॅकेडमी, मूर्तिजापूर यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जंयती निमित्त आयोजित “स्पर्धा परीक्षा आणि आजचा विद्यार्थी” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहिल्याने सभागृह अपुरे पडले असून, अनेक विद्यार्थ्यांनी उभे राहून संपूर्ण व्याख्यान ऐकले. यावरून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत वाढती जागरूकता आणि उत्सुकता दिसून आली.



प्रा. कांगणे यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त आणि योग्य नियोजन यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी अभ्यासाची योग्य पद्धत, वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासक्रमाचे नियोजन, तसेच मानसिक ताण-तणाव कसा हाताळावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “आजचा विद्यार्थी डिजिटल युगात वावरत असला तरी माहितीच्या ओघात योग्य निवड करण्याची क्षमता विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यावर भर देत, अपयश हे यशाची पहिली पायरी असल्याचे स्पष्ट केले. “स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता, चुका ओळखून त्यात सुधारणा करणे आणि पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माया नाईक (मा. जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती, अकोला) होत्या, तर उद्घाटन संजय नाईक यांच्या हस्ते पार पडले. आपल्या अध्यक्षीय भाषणात माया नाईक यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचा सल्ला दिला.

या वेळी जी. के. अॅकेडमीच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील परिश्रम आणि संस्थेचे मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन रवि गोंडकार (संचालक, जी. के. अॅकेडमी) यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन अंबेचरण ननीर यांनी प्रभावीपणे केले. प्रा. गजानन वर्घट, ज्ञानेश टाले, सुनिल सरदार ( ता. अध्यक्ष वंचित ), नगरसेविका शुभांगी सरनाईक यांचीही यावेळी उपस्थिती लाभली.

एकूणच, हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना नवचैतन्य देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post