चार जणांना अमानुष मारहाण, पाच घरांत घुसून धमक्या; तीन आरोपी अटकेत
Gavakadachibatmi network
अमरावती, चांदूररेल्वे : २० एप्रिल – कु-हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारला गावात १८ एप्रिलच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली. चोरीच्या संशयावरून एका तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा राग मनात धरून, अतुल दिलीप पवार (वय ३०) याने आपल्या २८ साथीदारांसह गावात दहशत माजवली.
या २९ जणांच्या टोळीने गावात घुसून चार जणांना घराबाहेर ओढून काढत काठ्यांनी व मुठींनी बेदम मारहाण केली. तसेच पाच गावकऱ्यांच्या घरांमध्ये बळजबरीने प्रवेश करून कुटुंबीयांना धमकावण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कारला गावातील एका घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या तरुणाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याच घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपींनी हल्ला केला.
आरोपींनी तक्रारदाराचे घर फोडून धमक्या दिल्या. तसेच अनिल शिरसकर यांच्या दुकानात घुसून त्यांना बाहेर ओढून काढत मारहाण केली. नरेंद्र जाधव यांच्या घरात घुसून त्यांनाही गंभीर जखमी केले. याशिवाय शरद चव्हाण, प्रेमदास चव्हाण, पंकज राठोड, राहुल पवार, राजू जाधव आणि नेपाल राठोड यांनाही लक्ष्य करण्यात आले.
या प्रकरणी कु-हा पोलिसांनी अतुल पवार, रमेश राठोड, बलिराम राठोड, अरुण जाधव, रामपाल चव्हाण, इसंबर पवार यांच्यासह एकूण २९ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न विविध कलम, मारहाण, धमकी, घरफोडी व बेकायदेशीर जमाव अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित २६ जणांचा शोध सुरू आहे. गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
.jpeg)

