कारला येथे तरुणावर अमानुष मारहाण; बंजारा समाजाचा पोलिसांवर एकतर्फी कारवाईचा आरोप

 

अमरावती, चांदूररेल्वे

कारला येथे तरुणावर अमानुष मारहाण; बंजारा समाजाचा पोलिसांवर एकतर्फी कारवाईचा आरोप

Karla Grampanchayat



          Gavakadachibatmi network 

अमरावती, प्रतिनिधी (ता. चांदूररेल्वे) – कारला गावात १७ एप्रिल रोजी मध्यरात्री घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अतुल दिलीप पवार या तरुणावर चोरीच्या संशयावरून काही गावकऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर पोलिसांनीही एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप बंजारा समाजाकडून करण्यात येत आहे.

Kurha police station amaravati


मिळालेल्या माहितीनुसार, अतुल पवार हे मानसिक असंतुलित अवस्थेत रात्रीच्या वेळी घराबाहेर पडले होते. त्यांनी काही घरांजवळ मदत मागितली असता, एका ठिकाणी ‘चोर’ असा आवाज झाल्याने गावातील काही लोक एकत्र आले. त्यानंतर काहींनी त्यांना पकडून ठेवत काठ्यांनी मारहाण केली.

घटनेदरम्यान काही लोकांनी अतुल पवार यांना विद्युत खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमुळे ते बेशुद्ध पडल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, पोलिस घटनास्थळी आल्यानंतर जखमी अवस्थेत असतानाही त्यांना अटक करण्यात आली, तसेच तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली नसल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीची दखल घेत त्यांना जामिनावर सोडले. त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, ती स्वीकारण्यात आली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यानंतर १८ एप्रिल रोजी बंजारा समाजातील काही लोक घटनास्थळी पाहणीसाठी गेले असता, पुन्हा वाद निर्माण झाला. काही व्यक्तींनी धमक्या देत गावात तणाव निर्माण केल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणात कु-हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी बंजारा समाजातील तब्बल २९ जणांवर गुन्हे दाखल केले असून तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी गावात लाठीचार्ज केल्याचा आरोप असून, यात शालेय विद्यार्थ्यांनाही मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे.

बंजारा समाजातील नागरिकांनी या सर्व प्रकारात पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अतुल पवार यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.

या घटनेमुळे कारला गावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





Tags:  पोलीस स्टेशन कु-हा, जिल्हाधिकारी अमरावती, बंजारा समाज, महाराष्ट्र, कारला, चांदूररेल्वे, अमरावती, जिल्हा पोलिस अधीक्षक अमरावती, मानवाधिकार आयोग, Maharashtra police, kurha police, Gavakadachibatmi,nhrcms, Village, crime,karla 

Post a Comment

Previous Post Next Post