माहूर तालुक्यातील 11 इंग्रजी शाळांची चौकशी करा – निवेदनाद्वारे मागणी
माहूर (जि. नांदेड), दि. 30 एप्रिल 2026
माहूर शहरासह तालुक्यातील नोंदणीकृत 11 इंग्रजी शाळांची सखोल चौकशी करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था चालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जेष्ठ पत्रकार नंदू संतान व शिवसेना (शिंदे गट) तालुका संघटक विनोद पाटील सूर्यवंशी यांनी केली आहे.
यासंदर्भात गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती माहूर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
माहूर हा आदिवासी बहुल व डोंगराळ भाग असून, तालुक्यातील इंग्रजी शाळांमध्ये मनमानी फी आकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, शाळांमध्ये आवश्यक माहिती फलक लावले आहेत का, शासनाच्या निकषानुसार शिक्षक व कर्मचारी नियुक्त केले आहेत का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेण्याचा घटनात्मक अधिकार असून, त्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक), नांदेड यांनी 5 ऑक्टोबर 2009 रोजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात 20 निर्देश जारी केले होते. मात्र, या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तालुक्यातील अनेक शाळांमध्ये सुसज्ज इमारत, अग्निशमन व्यवस्था, खेळाचे मैदान यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. याकडे गट शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तामिळनाडूतील कुंभकोणम येथे घडलेल्या दुर्घटनेचा उल्लेख करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक असताना, माहूर तालुक्यातील काही शाळांकडून त्याचा अवमान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनासोबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतही जोडण्यात आली असून, या गंभीर प्रकरणाची वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन सर्व इंग्रजी शाळांची तपासणी करावी व दोषी संस्था चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, योग्य कारवाई न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
Tags : #गावाकडचीबातमी, #villagenewsmarathi, #ruralnewsmaharashtra, #marathinewschannel, #farmernewsmarathi, #agriculturenewsindia, #latestmarathinews, #gavakdachibatmi, #breakingnewsmarathi, #villageupdate


