महिलांच्या अडचणी समजून घ्या; वसुलीसाठी तगादा न लावता माणुसकी जपा!


 महिलांच्या अडचणी समजून घ्या; वसुलीसाठी तगादा न लावता माणुसकी जपा!



बचत गटांच्या कर्मचाऱ्यांना पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे व परविन शेख यांचे आवाहन




किनवट : महाराष्ट्रभर बचत गटांच्या कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीचा विषय चर्चेत असताना, महिलांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन वसुली करताना संयम व सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे व पत्रकार परविन शेख यांनी केले.


काही महिलांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने दोन्ही पत्रकारांनी एका बचत गटाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी चर्चा करून महिलांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवण्याची आणि वसुलीसाठी अनावश्यक दबाव टाळण्याची विनंती केली.


ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगाराच्या मर्यादित संधी, उत्पन्नातील अनिश्चितता आणि वाढत्या कौटुंबिक खर्चामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य न झाल्यास महिलांना समजून घेऊन त्यांच्याशी सहकार्याची भूमिका ठेवणे आवश्यक आहे. वसुलीच्या प्रक्रियेत महिलांना मानसिक त्रास होईल, असे वर्तन टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हाच बचत गटांचा उद्देश


बचत गटांचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविणे हा आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या काळात महिलांना आधार देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि परतफेडीसाठी योग्य तो मार्ग शोधणे गरजेचे आहे. केवळ हप्त्यांच्या वसुलीला प्राधान्य न देता महिलांशी विश्वासाचे नाते जपावे, असे आवाहन मुंडे व शेख यांनी केले.

याशिवाय, यापूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड पूर्ण केलेल्या महिलांना नियमानुसार पुढील कर्जासाठी पात्रतेनुसार सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिलांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करणे आणि कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.

वसुलीसोबत माणुसकीही जपा!

कर्जाची परतफेड महत्त्वाची असली, तरी ती करताना महिलांचा सन्मान आणि त्यांच्या परिस्थितीचा विचार होणे तितकेच आवश्यक आहे. महिलांना त्रास देण्याऐवजी त्यांना आधार देऊन, संवाद व समन्वयातून प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, हा या भेटीमागील मुख्य उद्देश असल्याचे पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे व परविन शेख यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post