सेवा संकल्प अभियानांतर्गत मौजा कुर्ली येथे लोकसहभागातून वनराई बंधारा यशस्वी!

 


सेवा संकल्प अभियानांतर्गत मौजा कुर्ली येथे लोकसहभागातून वनराई बंधारा यशस्वी!



घाटंजी : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेतून आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत मौजा कुर्ली येथे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. उपविभागीय अधिकारी मा. महेश येळगटे यांच्या संकल्पनेतून तसेच तहसीलदार मा. विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी हा स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला.

पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवणे आणि आगामी काळात भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी महसूल अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत प्रत्यक्ष श्रमदान केले. सिमेंटच्या रिकाम्या पोत्यांमध्ये माती भरून मजबूत वनराई बंधारा उभारण्यात आला.

या उपक्रमात मंडळ अधिकारी पी. आर. कांबळे, ग्राम महसूल अधिकारी व्ही. एस. सोनुने, ग्रामपंचायत कर्मचारी देवानंद लोखंडे, मारोती सोनुले, भगवान रुद्राक्षवार, आरिफ शेख यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



प्रशासन आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे परिसरात जलसंधारणाची चळवळ उभी राहत असून, या बंधाऱ्यामुळे मौजा कुर्ली गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पाणी संवर्धनाच्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणासोबतच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

लोकसहभाग, श्रमदान आणि प्रशासनाच्या पुढाकारातून साकारलेल्या या जलसंधारणाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post