जय भीम च्या जयघोषात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.






       भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज माहूर शहरासह संपूर्ण तालुक्यात अत्यंत उत्साहात, चैतन्यमय वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. निळ्या पाखराची सावली अनुभवण्यासाठी सकाळपासूनच अबालवृद्धांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून 'जय भीम'चा जयघोष करत ठिकठिकाणी अभिवादन केले.

    तालुक्यातील दत्तमांजरी येथे सकाळी ठीक ८:३० वाजता पंचशील धम्मध्वजारोहणाने उत्सवाचा प्रारंभ झाला. तर टाकळी येथेही समाधान जाधव, जोतिबा दादा खराटे, राजेंद्र केशवे, पिंटू पाटील, डॉ.निरंजन केशवे, मनोज किर्तने, सौ.नम्रता किर्तने व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धम्मध्वजाला वंदन करण्यात आले. संपूर्ण परिसरात धम्मगीतांचा सुरावली घुमत होत्या.

     केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम उदाहरण वाई येथे पाहायला मिळाले.

  वाई येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 135 दात्यानी रक्तदानाचा विक्रम केला.यामध्ये उपासिका सौ.**नम्रता मनोज किर्तने** यांनी तब्बल १५ व्या वेळी रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला.

 तसेच येथील बौद्ध विहारामध्ये आदर्श मनोज किर्तने यांनी आकर्षक मोठे झुंबर भेट देऊन आपली 'दान पारामिता' जपली.


    माहूर शहरातील बुद्ध भूमी परिसरात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी येथे उपस्थित राहून महामानवास विनम्र अभिवादन केले. वॉर्ड क्रमांक १७ मध्येही मोठ्या उत्साहात भीमोत्सव साजरा करण्यात आला.

तालुक्यातील गावागावांत जणू उत्साहाची लाट उसळली होती. 

पवनाळा, पाचुंदा, कुपटी, साकूर, दगडी (धा.), धानोरा, महादापूर, दिगडी (कु.), हडसनी, आनमाळ, रुई, गुंडवळ, तांदळा, शेकापूर, लिंबायत, मालवाडा, पडसा, आष्टा, गोकुळ, सायफळ, मदनापूर, हरडप, अंजनखेड, तुळशी, आसोली, मेट, चौफुली, सेलू, करंजी, सिंदखेड या सह अनेक गावांमध्ये शांततेत कार्यक्रम व भव्य मिरवणुका काढण्यात आल्याचे वृत्त आहे.ढोल-ताशांच्या गजरात आणि निळ्या झेंड्यांच्या सावलीत निघालेल्या या मिरवणुकांनी संपूर्ण परिसर भीममय झाला होता. दिवसभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि अन्नदानाच्या उपक्रमांनी जयंती सोहळ्याची सांगता झाली. सर्व गावातील मंडळाचे कार्यकर्ते, उपासक, उपासिका, गांवकरी व मान्यवर यांच्या एकत्रित प्रयत्नाने विचारांची जयंती साजरी झाली. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी युवा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक देविदास चोपडे, सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर यांनी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post