प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण; रिकाम्या भूखंडांना आले डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप
शहरातील सुभाष नगर प्रभागात मागील काही दिवसांपासून घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नगरपालिकेकडून कचरा संकलन नियमित होत नसल्याने संतप्त नागरिक आपला ओला व सुका कचरा योगेश कल्याणकर यांच्या घराशेजारील उघड्यावरील मोकळ्या जागेत टाकत आहेत. परिणामी, परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सुभाष नगर हा लोकवस्तीचा महत्त्वाचा भाग असतानाही, येथे नगरपालिकेच्या घंटागाड्या नियमित येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. घरात कचरा साठवून ठेवणे कठीण होत असल्याने, नागरिक नाईलाजाने परिसरातील योगेश कल्याणकर या नागरिकाच्या घराशेजारील रिकाम्या भूखंडांवर कचरा टाकत आहेत. यामुळे कडक उन्हामुळे कचरा कुजण्यास सुरुवात झाली असून संपूर्ण परिसरात उग्र दर्प पसरला आहे. शिवाय पॉलिथिनच्या कॅरीबगा इतरत्र उडून जाऊन लोकांच्या घरामध्ये घाण पसरत आहे रस्त्यावरही उडालेल्या या कचऱ्यामुळे रस्त्याला उकीरड्याचे स्वरूप आले आहे साठलेल्या कचऱ्यामुळे डास, माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती व्यक्त होत आहे.कचऱ्याच्या ढिगाऱ्यापाशी भटक्या प्राण्यांचा वावर वाढल्याने कचरा टाकण्यात येणाऱ्या जागेच्या आजूबाजूतील लोकांच्या लहान मुलांना व लोकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे
याबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्ष कृती शून्य असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या गप्पा मारणारे प्रशासन स्वतःच्या शहरातील एका प्रभागाचा कचरा उचलण्यास असमर्थ ठरत असल्याने संताप व्यक्त होत आहे. गल्लीत नियमितपणे घंटागाडी आलेली नाही. कचरा कुठे टाकायचा असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे दुर्गंधीमुळे घरात राहणे कठीण झाले आहे. लहान मुले वारंवार आजारी पडत आहेत. प्रशासनाने आमचा अंत पाहू नये असा इशारा त्रस्त नागरिक, सुभाष नगर ने दिला आहे
त्रस्त झालेल्या नागरिकांनी आता नगरपालिका प्रशासनाकडे आक्रमक पवित्रा घेतला असून खालील मागण्या केल्या आहेत घंटागाडी दररोज ठराविक वेळी प्रभागात फिरवण्यात यावी.मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचऱ्याचा ढिगारा तात्काळ उचलून त्या जागेचे निर्जंतुकीकरण करावे.सूचना देऊनही कचरा संकलन सुरळीत न झाल्यास संबंधित कंत्राटदार किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी.
प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास, येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुभाष नगरमधील नागरिकांनी दिला आहे.

