पालकमंत्री Atul Save यांना नगराध्यक्ष Firoz Dosani यांचे निवेदन; आदिलाबाद–माहूर–वाशिम रेल्वे मार्गास मंजुरीची मागणी
माहूर : आदिलाबाद–माहूर–वाशिम–पोहरादेवी या प्रस्तावित रेल्वे मार्गास तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माहूर हे प्रमुख तीर्थक्षेत्र व पर्यटन केंद्र असून येथे वर्षभर लाखो भाविक येत असतात. तसेच विदर्भातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेले पोहरादेवी, उनकेश्वर येथील शरभंग ऋषींचा आश्रम, हेमाडपंथी मंदिरातील गरम पाण्याचे कुंड यांसारखी महत्त्वाची धार्मिक स्थळे या प्रस्तावित रेल्वेमार्गाने जोडली जाणार आहेत. त्यामुळे भाविक व पर्यटकांच्या प्रवासाला मोठी सोय होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या भागात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे स्थानिक बेरोजगार युवक, मजूर व ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे, नाशिकसह इतर शहरांकडे स्थलांतर करतात. रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री Lalu Prasad Yadav यांनी किनवट येथे ब्रॉडगेजचे उद्घाटन केल्यापासून सुमारे २२ वर्षे हा आदिलाबाद–माहूर–पुसद–वाशिम रेल्वे मार्ग प्रलंबित आहे. २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली होती, तर २०१६ मध्ये सुमारे २२५ किमी लांबीच्या या प्रकल्पासाठी अभियांत्रिकी व वाहतूक सर्वेक्षणास मंजुरी देऊन अंदाजे २६४५.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता.
तसेच, २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारतर्फे या प्रकल्पासाठी ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याची घोषणा करण्यात आली होती. तरीही प्रकल्पाला अद्याप गती मिळालेली नसल्याने नागरिक, भाविक व विविध समाजघटकांत नाराजी व्यक्त होत आहे.
माहूर दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केली आहे


