५१ गावांत योजना कागदावरच, जनता पाण्यासाठी व्याकुळ! गुंडवळ वासियांचे पालक मंत्र्यांना निवेदन.
जलजीवन मिशन अंतर्गत 'हर घर नल , हर नल मे जल ,ची घोषणा हवेतच विरल्याचे विदारक चित्र माहूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही तालुक्यातील ५१ गावांमध्ये ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली असून, कंत्राटदार, प्रशासन आणि सरपंचांच्या संगनमताने जनतेच्या पैशांचा पाण्यात खेळ सुरू असल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
माहूर तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी २०२२-२३ मध्ये ५१ गावांना कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मात्र, अपवाद वगळता एकाही गावात योजना पूर्णत्वास गेलेली नाही. काही ठिकाणी केवळ टाक्यांचे सांगाडे उभे आहेत, तर कुठे रस्ते खोदून ठेवल्याने चिखल आणि धुळीचे साम्राज्य पसरले होते. ते काम ग्रामपंचायतींनी दर्जाहीन करून पैसे कमावले.जल जीवन मिशन च्या कामात तर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केवळ कागदोपत्री 'पूर्ण' दाखवून बिले उचलल्याचा खळबळजनक आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे.
तालुक्यातील तापमान ४० अंशा च्या पार गेल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. विहिरी, बोअरवेल आणि तलाव कोरडे पडले आहेत. अनेक गावांत 'नळ आहेत पण पाणी नाही' तर 'पाणी आहे पण नळ नाहीत' अशी स्थिती आहे. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून, डोक्यावर हंडे-घागरी घेऊन त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि कुटुंबांच्या आरोग्यावरही होत आहे.
प्रशासनाकडून सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तव मात्र भयावह आहे. कंत्राटदार आणि काही सरपंचांनी मिळून बिनधास्त निकृष्ट कामे केल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. आता पुढील ३० वर्षे या गावांना पाणी पुरवठा साठी निधीच मिळणार नाही. म्हणजे योजनेची बट्ट्याबोळ झाला आणि या हेड वर पुन्हा निधीही मिळणार नसल्याने, तालुक्याचे 30 वर्ष आणि करोडो रुपये बोक्यानी खावून मोकळे झाले आहेत.सर्वांना त्यांचे कमिशन पोहोचले आहे,त्यामुळे आमचे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही अशी अरेरावीची भाषा काही संबंधितांकडून वापरली जात असल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात दत्तमांजरी येथील तत्कालीन सरपंचाने विकास कामांसाठी आलेला 14 व्या वित्त आयोगाचा 16 लाख रुपये निधी कोणतेही काम न करता अपहार केला. तसा गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून अंतिम अहवाल 2022 मध्ये दिला.आज पर्यंत भ्रष्टाचारी यंत्रणेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून गुत्तेदारांचा वरील दावा खरा वाटतो.
गोंडखेडी, दिगडी, करंजी, भगवती, उमरा, दत्तमांजरी, मांडवा, पाचुंदा, पवनाळा, शिऊर, सावरखेड, मदनापूर, आष्टा, टाकळी, रामपूर, महादापूर, हिंगणी, मुंगशी यांसह ५० हून अधिक गावांत जलजीवन मिशनची कामे रेंगाळलेली आहेत.
दरम्यान, माहूरगड दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुलजी सावे यांची गुंडवळ येथील उपसरपंच राहुल कांबळे आणि ग्रामस्थांनी भेट घेतली. निवेदनाद्वारे त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
नैसर्गिक स्त्रोत आटल्याने तत्काळ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवावी.
दलित वस्ती आणि तांडा वस्तीसाठी अलग अलग सुसज्ज सभागृहाची निर्मिती करावी. स्मशानभूमीत शेड, कंपाउंड वॉल आणि वस्तीमध्ये सीसी रस्त्यांची मागणी करण्यात आली.
पालकमंत्र्यांनी या मागण्यांची गंभीर दखल घेत सकारात्मक आश्वासन दिले आहे.
भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून, आशादाई वाटलेल्या जल जिवन मिशन योजनेची बालुशाही झाल्याने आता तरी प्रशासनाला जाग येईल का? आणि रेंगाळलेल्या कामांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल का? असा सवाल माहूरवासीय विचारत आहेत.
प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कंत्राटदारांचे काही सरपंचांना सोबत घेऊन,सर्वांना'कमिशन' यामुळे गोरगरिबांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा चौकशी च्या नावाखाली मलिदा मिळतो हा जनतेचा समज पक्का झाल्याशिवाय राहणार नाही. योजना कार्यान्वित न होणे हे अपयश कोणाचे आहे, त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे ही मागणी सर्व स्तरातून होत आहे.
गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593

