नवी मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
नेरुळ मधील सेक्टर २ येथे राजीव गांधी ब्रिजच्या जवळ साई जनसेवा प्रतिष्ठान व सिद्धिविनायक केअर सेंटर चे संचालक डॉ. रविंद्र गोसावी यांच्या संयुक्त विद्यमाने साई भंडाऱ्याच्या निमित्ताने दिनांक २८. २. २६ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे दोनशे गरजू नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. तसेच महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कामगार यांनीही या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराची सुरुवात साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष रतन मांडवे, नवनिर्वाचित नगरसेवक अभिजीत देसाई, सिद्धिविनायक केअर सेंटरचे संचालक डॉ. रविंद्र गोसावी, इंद्रधनुष्य अपार्टमेंटचे साई भक्त रमेश शिवतरकर तसेच श्री. चव्हाण व श्री. मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.
डॉक्टर गोसावी यांनी शिबिराचे आयोजन कल्पकतेने केले होते. नागरिकांना त्यांनी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या त्यात प्रामुख्याने साई दृष्टी आय हॉस्पिटल यांच्या तर्फे प्रदीप सर व त्यांच्या टीमने मोफत डोळे तपासणी केली व गरजूंसाठी नाममात्र दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. मयुरेश हॉस्पिटल यांच्या मार्फत सर्व रुग्णांची मोफत रक्तदाब, शुगर व प्राथमिक तपासणी, ईसीजी तसेच फ्री कन्सल्टेशन देण्यात आले. तसेच रुग्णांसाठी माफक दरात अँजिओग्राफी व इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. निओ डायग्नॉस्टिक सेंटर यांच्या तर्फे सर्व रुग्णांची मोफत CBC, कोलेस्टेरॉल व TSH तपासणी करण्यात आली.
समाजाच्या आरोग्य हितासाठी भविष्यातही असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. रविंद्र गोसावी यांनी दिली.
साई जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सचिन धुमाळ तसेच सिद्धिविनायक केअर सेंटरच्या डायरेक्टर सौ. अनिता रविंद्र गोसावी यांनी शिबिराच्या शेवटी सर्व वैद्यकीय टीमचे आभार मानले.
