प्रतिनिधी,श्रीकांत राऊत यवतमाळ
महागाव : पवित्र रमजान महिन्याची सुरुवात सर्वत्र भक्तीभावाने आणि उत्साहात झाली असून महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे एका चिमुकलीने आपला पहिला रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथील पत्रकार शेरखान पठाण यांची आठ वर्षीय कन्या जिया खान हिने श्रद्धा, संयम आणि उत्साहाच्या बळावर आपला पहिला रोजा यशस्वीरीत्या पूर्ण केला.
मुस्लिम समाजासाठी रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास ठेवत नमाज पठण, कुरआन वाचन, दानधर्म आणि गरजूंना मदत करण्यास विशेष महत्त्व दिले जाते.
लहान वयातच धार्मिक संस्कारांची जपणूक करत जियाने कुटुंबीयांसमवेत नमाज अदा केली. तिच्या या चिकाटीचे आणि धार्मिक भावनेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. अनेकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जियाच्या या पहिल्या रोज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून तिच्या या प्रेरणादायी कृतीने इतर बालकांसाठीही एक आदर्श निर्माण केला आहे.
