मूर्तिजापूरात बंजारा समाजाच्या कुलदैवत माता जगदंबा देवीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात

 

Gavakadachibatmi


भव्य मंदिरात मंत्रोच्चारात विधी संपन्न ; मंदिर परिसर व सभागृहासाठी निधी जाहीर 


विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मूर्तिजापूर : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या माता जगदंबा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मूर्तिजापूर येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील प्रशस्त जागेत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

संत सेवालाल महाराज यांच्या पगडी परंपरेच्या तसेच संत रामराव बापू महाराजांच्या भोग परंपरेच्या साक्षीने धर्मगुरू महंत परमपूज्य नेहरू बापू महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा-अर्चना व मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, जयघोष आणि भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात भक्तिरसाचा माहोल निर्माण झाला होता.

या सोहळ्यास मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी मंदिर परिसरात कंपाऊंड व पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. तसेच भविष्यात सभागृह उभारणीसाठीही निधी देण्याची घोषणा करण्यात आली.

कार्यक्रमाला बाबूसिंग पवार, बंडूभाऊ राठोड, श्रीमती दमयंतीबाई रामसिंह राठोड, आर. एस. जाधव, महादेराव पवार, डॉ. आर. जी. राठोड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चर्जन, भाजप नगरसेवक राम जोशी, नामदेव चव्हाण, गजानन नाकट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताराम पवार यांनी केले. पी. पी. राठोड यांनी प्रास्ताविकातून मंदिर उभारणीमागील समाजभावना विशद केली, तर माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार यांनी आभार प्रदर्शन केले.

माता जगदंबा ही बंजारा समाजाची कुलदेवता मानली जाते. या मंदिराच्या उभारणीमुळे समाजाला एकत्र येण्यासाठी आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी नवे आध्यात्मिक केंद्र उपलब्ध झाले आहे. कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी सभागृह उभारणीसाठी निधी देण्याची घोषणा धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज (विधान परिषद सदस्य) यांच्या वतीने त्यांचे शिष्य महंत परमपूज्य नेहरू महाराज यांनी केली.भक्ती, परंपरा आणि समाजएकतेचा संगम ठरलेला हा प्राणप्रतिष्ठा सोहळा मूर्तिजापूरच्या धार्मिक व सामाजिक इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post