अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग ; हात धरून विनयभंगाचा प्रयत्न

 

Crime


पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल


विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मूर्तिजापूरः शहरातील चिखली गेट परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा दुचाकीवरून पाठलाग करून जबरदस्तीने हात पकडत विनयभंगाचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना मंगळवारी दि. २४ फेब्रुवारी रात्री घडली. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी संतोष जाधव वय अंदाजे २५, रा. मूर्तिजापुर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. प्राप्त माहितीनुसार, विदयार्थीनी वय १५ वर्षे २ महिने ही आपल्या बहिणीसह स्कुटीने मूर्तिजापूरहून चिखलीकडे जात असताना सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिचा दुचाकीवरून पाठलाग केला. चिखली गेट येथे स्कुटी आडवी लावून तिला जबरदस्तीने थांबवण्यात आले. 'मला बोलायचे आहे' असे म्हणत आरोपीने पीडितेचा डावा हात जबरदस्ती पकडला. या कृत्यामुळे पीडितेच्या मनात भीती व लज्जा निर्माण झाली. विनयभंग करण्याच्या उद्देशाने आरोपीने पाठलाग करून गैरवर्तन केल्याचे फिर्यादीच्या जबानीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर रात्री १०.५० वाजता मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(१) (अ), ७८, १२६ (२) तसेच पोस्को कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीवर यापूर्वीही मारहाण, धमकी, दरोडा, चोरी तसेच शस्त्र कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार इरफान शेख करीत आहे.


Tag : #विनयभंग #POCSO #सुरक्षित_भारत #मुलींचीसुरक्षा #अल्पवयीन_विद्यार्थिनी #पाठलाग #गुन्हेगारी #महिलासुरक्षा #न्याय #लैंगिक_गुन्हा #गुन्हेगारांना_शिक्षा #सामूहिक_प्रतिकार #लज्जास्पद_घटना #बालकांचे_संरक्षण #मराठीबातम्या

Post a Comment

Previous Post Next Post