Grampanchayat| बोधडीतील सरपंच पदाचा राजकीय संघर्ष शिगेला ;9 जूनला होणार दूध का दूध पाणी का पाणी

 

Grampanchayat


बोधडीतील सरपंच पदाचा राजकीय संघर्ष शिगेला ;9 जूनला होणार दूध का दूध पाणी का पाणी


Anil bangale



किनवट - बोधडी ग्रामपंचायतीत सध्या राजकीय वातावरण तापले असून, विद्यमान सरपंच बालाजी भिसे यांच्यावर सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ जून २०२५ रोजी विशेष ग्रामसभेत जनतेतून प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सुरू विद्यमान आदिवासी प्रवर्गातील सदस्यांनी संयुक्त पत्र व्हायरल केले आहे. या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

सदर अविश्वास प्रस्ताव आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा होत चालल्याने ग्रामपंचायतीतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील (आदिवासी) विद्यमान आठ सदस्यांनी संयुक्तपणे एका पत्राद्वारे आपली भूमिका मांडली असून ते पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात संदीप राजाराम लाखाडे, बाबूजी संभाजी तोरकड, गणेश सुरेश गवले, माणिक संभाजी पेंदोर, त्रिशाला बालाजी शेळके, दैवशाला दत्ता भिसे, राधा गोविंद आमले व मंगल नामदेव कोतवाल यांचा समावेश आहे.

या आठही सदस्यांनी संयुक्त पत्र व माध्यमांशी संवाद साधत स्पष्ट भूमिका मांडली असा दावा पत्रातून होत आहे ते की, “हा अविश्वास प्रस्ताव कोणत्याही जातीय अथवा आदिवासी-बिगरआदिवासी संघर्षातून सादर करण्यात आलेला नसून, केवळ ग्रामविकास, पारदर्शकता आणि जनतेच्या अपेक्षांनुसार कारभार व्हावा यासाठी संविधानिक चौकटीतून पावले उचलली जात आहेत.

या पत्रात त्यांनी असेही नमूद केले आहे की, “ग्रामसभा हीच सर्वोच्च आहे. आम्ही तिच्या निर्णयाचा सन्मान करू. येत्या ९ तारखेला ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल.” हे पत्र सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, नागरिकांमध्ये यासंदर्भात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

    सदर पत्रातून सांगण्यात आले की, पूर्वीच्या काळातही बोधडी ग्रामपंचायतीतील आदिवासी समाजातील भारत शेळके व प्रमिला बोडके या सरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव आले होते. त्यावेळी विद्यमान सरपंच बालाजी भिसे यांनी त्या प्रस्तावांना पाठिंबा दिला होता, हे विद्यमान सदस्यांनी पत्रातून अधोरेखीत केले आहे.

“लोकशाही ही चैतन्यशील प्रक्रिया आहे. संविधानिक चौकटीत राहून अविश्वास प्रस्ताव ही वैध आणि गरजेची प्रक्रिया आहे. याकडे कोणत्याही जाती, धर्म किंवा समाजाच्या चष्म्यातून न पाहता, ग्रामहिताच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे,” असा ठाम संदेश सदर पत्रातून आठही आदिवासी प्रवर्गातील सदस्यांनी दिला आहे.

दरम्यान, ९ जून रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, या घटनाक्रमामुळे बोधडी ग्रामपंचायतीतील राजकारणाचे नवे समीकरण ठरणार का, याकडे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post