विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
परतवाडा : अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज वडनेर भुजंग ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अर्जुन शिवशंकरराव पवार (वय ४४) यांना ३०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका मंगल कार्यालयाच्या थकीत कराची रक्कम माफ करण्याच्या बदल्यात त्यांनी ही लाच मागितली होती.
या प्रकरणी तक्रारदार, वय ४२, हे वडनेर भुजंग येथील एका मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आहेत. त्यांचे 'सर्वज्ञ मंगलमय' नावाचे मंगल कार्यालय अकृषक जागेवर आहे. या जागेच्या थकीत कराबाबत त्यांना राष्ट्रीय लोक अदालतकडून नोटीस मिळाली होती. या प्रकरणी तक्रारदार आणि त्यांचे भाऊ न्यायालयात हजर राहिले, परंतु ग्रामपंचायत अधिकारी अर्जुन पवार अनुपस्थित असल्याने थकीत कर भरला गेला नाही.
त्यानंतर १२ जून, २०२५ रोजी तक्रारदारांनी आपल्या भावाच्या नावाने थकीत कराच्या बिलाची मागणी करणारा अर्ज दिला. या संदर्भात त्यांनी अर्जुन पवार यांची भेट घेतली असता, पवार यांनी तक्रारदाराला सांगितले की, "तुमचा सन २०२० ते २०२५ पर्यंत एकूण ६ वर्षांचा ग्रामपंचायत कर थकीत आहे. त्यापैकी मागील दोन वर्षांचा थकीत कर भरा, त्याची पावती मी तुम्हाला देतो. परंतु उर्वरित ४ वर्षांची अंदाजे ८०,००० रुपये थकीत कर रक्कम मी माफ करतो, ती तुम्ही भरू नका. त्या बदल्यात मला ३०,००० रुपये द्यावे लागतील." नाईलाजाने तक्रारदाराने यासाठी होकार दिला.
पवार यांनी मंगल कार्यालयाचे थकीत कर माफ करण्यासाठी ३०,००० रुपयांची लाच मागितल्याने तक्रारदारांनी १६ जून, २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारावर १७ जून, २०२५ रोजी सकाळी १०:५७ ते ११:५६ या वेळेत पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान अर्जुन पवार यांनी ३०,००० रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
आज, १७ जून, २०२५ रोजी सायंकाळी १७:५० ते १७:५९ या वेळेत मोती मंगल कार्यालय जवळ, अचलपूर, जि. अमरावती येथे सापळा रचण्यात आला. या सापळा कारवाईदरम्यान, अर्जुन पवार यांनी तक्रारदाराकडून पंचांसमोर ३०,००० रुपये स्वीकारले. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून, अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक श्री. सुनिल किनगे, आणि पोलीस उपअधीक्षक श्री. मंगेश मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सापळा व तपास अधिकारी: पोलीस निरीक्षक, स्वप्निल श. निराळे, ला.प्र.वि. अमरावती.
कारवाई पथक: श्री. मंगेश मोहोड (पोलीस उपअधीक्षक), निलिमा सातव (पोलीस निरीक्षक), पोहवा राजेश मेटकर, पो.शि वैभव जायले, पो.शि. आशिष जांभोळे, पो.शि. उपेंद्र थोरात, चालक पो. हवा. गोवर्धन नाईक, पो. शि. राजेश बहिर..