छायाचित्र लक्ष्मीकांत मुंडे
Nanded: किनवट तालुक्यातील सर्वात जुनी व मोठी मानल्या जाणाऱ्या बोधडी येथील सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर झाला. २८ मे रोजी तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १५ उपस्थित पैकी १५ सदस्यांनी मतदान केल्याने प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर झाला आहे.
तीन वर्षांपूर्वी बोधडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यामध्ये १७ ग्रामपंचायत सदस्य व थेट जनतेमधून सरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडून सरपंचासह भाजप पुरस्कृत पॅनलचे ९ सदस्य तर विरोधी ८ निवडून आले. त्यामुळे सरपंच, उपसरपंच हे एकाच पॅनलचे झाले. परंतु सरपंच बालाजी भिसे यांच्या कार्यप्रणालीवर ठपका ठेवत सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येत २६ मे रोजी तहसीलदार किनवट यांच्याकडे सरपंचांच्या विरुद्ध अविश्वास दाखल केला. २८ मे रोजी अविश्वास प्रस्तावावर मतदानाकरिता विशेष सभेचे आयोजन केले.
तहसीलदार डॉ. शारदा चोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेमध्ये १७ पैकी २ सदस्य अनुपस्थित होते. तर सत्ताधारी ७ व विरोधक ८ अशा एकूण १५ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान करून प्रस्ताव मंजूर केला. सरपंचांनी जनतेच्या दरबारात न्याय मागणार असल्याची प्रतिक्रिया दिली. यावेळी तहसील कार्यालय किनवटचे नायब तहसीलदार डी. एस. फोले, सहायक महसूल अधिकारी डी. सी. भुरे, मंडळ अधिकारी जयराम गाडे,तलाठी प्रियंका डुकरे, ग्राम विकास अधिकारी प्रेम गुट्टे यासह पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.