किनवट :- येन्दा ते भूलजा दरम्यानच्या पैनगंगानदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करुन विना परवाना वाहतूक करणारे ट्रॅक्टर नायब तहसिलदारांनी रंगेहात धरुन किनवट तहसिल कार्यालयात लावले. १७ मे रोजी सायंकाळी सदरची कारवाई करण्यात आली असून नंबरप्लेटविना धरलेला ट्रॅक्टर हे रविंद्र रामचंद्र पवार यांचे असल्याचे महसूल पथकाने सांगितले. तर १६ मे रोजी सायंकाळी पोतरेड्डी परिसरातूनही रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. ग्राम महसूल अधिकार्यांसह मंडळ अधिकार्यांनी जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री रेतीच्या गाड्या धरपकड करतांना दिसतात.
येन्दा ते भूलजा पैनगंगानदीपात्रातून भरमसाठ रेतीचा उपसा चालतोय, साठेबाजीसुद्धा केलेली असल्याचे सूत्रांकडून ऐकायला मिळते. रेतीची तस्करी करणार्या किनवट तालुक्यातील ट्रॅक्टरांपेक्षा विदर्भातील ट्रॅक्टरांच्या संख्येत लक्षनीय वाढ झाली. पैनगंगा अभयारण्याच्या कार्यकैक्षेतील पैनगंगानदीतील रेती खरबी वनविभाग यंत्रणा खुल्लेआम हप्तेगीरीतून विक्री करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतू किनवट तहसिल कार्यालयातील यंत्रणा सजग असून कारवाई करतांना दिसते.
१६ आणि १७ मे रोजी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकार्यांच्या पथकाने पोतरेड्डी आणि येन्दा-भूलजा दरम्यान दोन ट्रॅक्टर धरुन तहसिल कार्यालयात जमा केले आहेत. तहसिलदार डाॅ.शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयराम पांडूरंग गाडे, विनोद बाबूराव सिंगेवार, सचिन खंडेराव धुमाळे यांच्यासह अन्य कर्मचार्यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.