सूचना फलकांच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा – अभिषेक गावंडे यांची लोकायुक्त न्यायालयात थेट तक्रार
अमरावती,दर्यापूर :- दर्यापूर येथील विशेष प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 अंतर्गत सूचना फलक खरेदीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा भयंकर प्रकार आता लोकायुक्त न्यायालयात पोहोचला आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक पंजाबराव गावंडे यांनी 2 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्य लोकायुक्त व उप लोकायुक्त न्यायालयात अधिकृत तक्रार दाखल करून या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.
गावंडे यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे की, अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक लावण्याच्या नावाखाली सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च दाखवला गेला. प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी फलकच लावले गेले नाहीत, आणि जेथे लावले गेले तेथे ते चुकीच्या ठिकाणी होते. ही बाब गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे स्पष्ट लक्षण आहे.
गावंडे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध पुरावे गोळा करून तक्रार दाखल केली असून, संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी शासनाच्या पैशांचा उधळपट्टीसारखा वापर करून सरकारी यंत्रणेला गृहित धरले, हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. सूचना फलकांची खरेदी प्रक्रिया पारदर्शक नव्हती, कोटेशन, निविदा आणि वर्क ऑर्डर यांसारखी मूलभूत कागदपत्रेही उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. CSR दर आणि प्रत्यक्ष खरेदी दरांमध्ये मोठा फरक आढळून आला.
सदर प्रकरणात संबंधित ठेकेदार – सारडा इन्फ्रा (अकोला), एस.एम. इंडस्ट्रीज (अकोला) आणि आर.एम.एस. इंडस्ट्रीज (जळगाव) यांचा सहभाग असून, यांना काम कोणत्या निकषांवर देण्यात आले, हे आजतागायत गूढच आहे. या प्रकरणातील प्रत्येक पैशाचा हिशोब व्हावा आणि दोषींना लोकायुक्त न्यायालयात जाब द्यावा लागावा, अशी गावंडे यांची ठाम भूमिका आहे.
तक्रारीत तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी व इतर तीन उपविभागीय अभियंते, तीन ठेकेदार, तसेच सचिव (रस्ते, सा.बां. विभाग), मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शिवाय, माहिती अधिकारी हेमंत भोये यांनी माहिती अधिकार कायद्याचे गंभीर उल्लंघन करून माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
“जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याला आता लोकायुक्त न्यायालयात उत्तर द्यावंच लागेल – कुणालाही पळवाट मिळणार नाही,” असा ठाम इशारा अभिषेक गावंडे यांनी दिला आहे. त्यांच्या या तक्रारीमुळे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या झोपेचे पार खोळंबले असून, विभागीय पातळीवर खळबळ माजली आहे.
प्रतिक्रिया •
"मी सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन, स्वतःच्या खर्चाने माहिती अधिकार कायद्यान्वये पुरावे गोळा केले. जनतेच्या पैशाचा असा उघड उघड गैरवापर होत असताना गप्प बसणे म्हणजे स्वतःच्या कर्तव्याशी गद्दारी करण्यासारखे आहे. म्हणूनच मी ही तक्रार लोकायुक्त न्यायालयात दाखल केली आहे. कोणताही अधिकारी, ठेकेदार किंवा वरिष्ठ अधिकारी हा कायद्याच्या वर नाही. या प्रकरणातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीला उत्तर द्यावंच लागेल, आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत मी शांत बसणार नाही. हा केवळ एक प्रकल्प नाही, ही लढाई आहे – पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या हक्कासाठी!"
• अभिषेक पंजाबराव गावंडे
जिल्हाअध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अमरावती
Tags : #अमरावती,#भ्रष्टाचार गावाकडची बातमी #महाराष्ट्र #गावसहेली, #Gavakadachibatmi #Google #Youtube #fecbook #सुचनाफलक #घोटाळा #लोकआयुक्त, #न्यायालय, #मुंबई #मराठीबातमी, #Right to Information Act , गावाकडची बातमी #देवेंद्रफडणवीस #देवेंद्रभोंडे, #Maharashtra #India #mumbai, #Amaravati, #RTI, #Devendrafadanvis, #जिल्हाधिकारी_अमरावती, #बातमीअमरावती, #दर्यापूर, #एकनाथशिंदे #अजितपवार, #GavakadachiBatmi.com, #गुगल, #फेसबुक, #सोशल मीडिया, #amaravatinews, #सोशल मीडिया नेटवर्क, #माहितीअधिकार, #AbhishekGawande #भारत, #अभिषेक गावंडे