Solapur Fire | सोलापुरात अग्नितांडव; सेंट्रल इंडस्ट्रीजच्या आगीत टॉवेल कारखाना मालकासह आठ जणांचा मृत्यू
Towel factory fire News : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्रीजला लागलेल्या आगीत कारखान्याचे मालक, त्यांचा नातू, नातसून, पणतू यांच्यासह चार कामगारांचा मृत्यू झाला. यातील तिघांचा होरपळून, तर पाच जणांचा गुदरमून मृत्यू झाला आहे.
सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्रीजला लागलेल्या आगीत कारखान्याचे मालक, त्यांचा नातू, नातसून, पणतू यांच्यासह चार कामगारांचा मृत्यू झाला. यातील तिघांचा होरपळून, तर पाच जणांचा गुदरमून मृत्यू झाला आहे. सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि एनटीपीसीच्या कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करूनही कारखाना मालकासह आठ जणांना वाचविण्यात अपशय आले. या घटनेमुळे सोलापूरमधून हळहळ व्यक्त होत आहे.
आगीच्या घटनेत कारखान्याचे मालक उस्मान मन्सुरी (वय ७८) यांच्यासह नातू अनस मन्सुरी (वय २४), नातसून शिफा मन्सुरी (वय २३) आणि मालकाचा पणतू युसुफ अनस मन्सुरी (वय १ वर्ष) यांचा समावेश आहे. याशिवाय कारखान्यातच राहणारे कामगार मेहताब बागवान (वय ५१), आयेशा बागवान (वय ४५), हिना बागवान (वय ३५) व सलमान बागवान (वय १८) यांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
अक्कलकोट रोड एमआयडीसीतील (MIDC) सेंट्रल इंडस्ट्रीज या टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे चारच्या सुमारास आग लागली. कारखान्याचे मालक उस्मान हसन मन्सुरी आणि यांच्या कुटुंबातील पाचजण कारखान्यातच राहायला होते. तसेच, चार कामगारही त्याच ठिकाणी राहत होते, त्यामुळे टॉवेलच्या कच्च्या मालाला लागलेली आग भडकतच गेली. त्यामुळे आतमध्ये अडकलेल्या आठ जणांना बाहेर पडणेही मुश्कील झाले.
टॉवेल कारखान्याला आग लागल्याची माहिती मिळताच अक्कलकोट एमआयडीसी केंद्रातील सोलापूर (Solapur) महापालिकेच्या अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाला. मात्र, आगीचे स्वरूप पाहताच इतर केंद्रातून अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने अग्निशामक दलाच्या जवानांचे प्रयत्न तोकडे पडत होते. आग भडकत असताना पाण्याची कमरताही मोठ्या प्रमाणात भासली.
मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख, मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात यश आले. मात्र, कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्या कुटुंबातील चार आणि कामगार कुटुंबातील एक अशा पाच जणांचा शोध दुपारपर्यंत सुरू होता. दुपारी कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी, त्यांचा नातू अनस, नातसून शिफा मन्सूरी, तसेच नातवाचा मुलगा युसूफ, कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान अशा पाच जणांचे मृतदेह मिळाले. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुखांनी पंढरपूर, अक्कलकोट नगरपालिका, चिंचोली एमआयडीसी आणि एनटीपीसी आदी ठिकाणच्या अग्निशामक दलास पाचारण केले. सर्वांच्या प्रयत्नांतून दुपारी चारच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले. पण, कारखान्याच्या आतील एकाही व्यक्तीला वाचविण्यात त्यांना यश आले नाही, ही दुर्दैव.
• अग्निशामक दलाच्या प्रमुखांसह तिघांना भाजले •
दरम्यान, आग आटोक्यात आणणताना सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्या हाताला मोठ्या प्रमाणात भाजले आहे. फायरमन पंकज चौधरी यांनाही जखमा झाल्या असून फायरमन समीर पाटील यांना आग आटोक्यात आणताना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
• आग पुन्हा भडकली •
टॉवेल कारखान्याला रविवारी (ता. 18 मे) पहाटे चारच्या सुमारास लागलेली आग दुपारी चारच्या सुमारास म्हणजे बारा तासांनी आटोक्यात आली. पण, त्यानंतर साडेपाचच्या सुमारास त्या टॉवेल कारखान्याला पुन्हा आग लागली आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.