किनवट - महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार असून, या उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांची निवड करण्यात आली आहे.
किनवट येथे दरवर्षी म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही महात्मा फुले यांच्या जयंतीदिनापासून दि. ११ एप्रिलपासून या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. ११ एप्रिल रोजी म. फुले यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहण करून मानवंदना दिली जाईल. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी जेतवन बुद्धविहार येथे ध्वजारोहण आणि भोजनदान होईल. सायंकाळी ५ वाजता जेतवन बुद्धविहारापासून म. फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या तैलचित्रांची मिरवणूक निघेल. ही मिरवणूक किनवट शहरातील प्रमुख रस्त्यांनी जावून जेतवन बुद्धविहार येथे विसर्जित होईल.
दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी हुतात्मा गोंडराजे मैदान येथे जागर संविधानाचा भीम महोत्सव होईल. या महोत्सवात राजाभाऊ शिरसाट यांचा 'भीमा तुझ्या जन्मामुळे', प्रा. अविनाश नाईक प्रस्तुत 'गाथा महासूर्याची' आणि भीम शाहीर नागसेनदादा सावदेकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होईल. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ होईल. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील हे कार्यक्रम ाच्या अध्यक्षस्थानी राहतील. लाँग मार्चचे प्रणेते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे नेते भैय्यासाहेब इंदिसे, लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे, हदगावचे आमदार बाबुराव कोहळीकर, आदिलाबादचे खासदार नागेश गोडाम, पांढरकवडा-केळापूरचे आमदार राजू तोडसाम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.
या महोत्सवात मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य प्रशासक संतोष तिरमनवार, सहायक समाज कल्याण आयुक्त शिवानंद मिनगिरे, दौंड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कावळे, मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेस्क ऑङ्गिसर प्रशांत राठोड यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती म. फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी दिली.