भांबोरा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे गाव समितीकडून भागवत सप्ताहाची नुकतीच सांगता करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये भांबोरा येथील शिक्षक लिलाधर मासोदकर यांचा त्यांच्या शाळेतील उत्कृष्ट कामाबद्दल मान्यवरांकडून शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
लिलाधर मासोदकर हे भांबोरा येथील शाळेत सहा वर्षापासून कार्यरत आहे .आज येथील जिल्हा परिषद शाळेने बरीच प्रगती केलेली आहे. येथील मुख्याध्यापिका कल्पना भोजने आणि शिक्षक संध्या भोनखडे आणि लिलाधर मासोदकर यांच्या प्रयत्नामुळे शाळेची नवी ओळख तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत असताना या गावातील शाळेची पटसंख्या सहा वर्षात दुप्पटीने वाढलेली आहे.
एवढेच नव्हे तर यावर्षीच्या तालुका परसबाग स्पर्धेत या शाळेने प्रथम क्रमांक आणि जिल्हा परसबाग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावून गावाचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा चमकवलेले आहे. त्यामुळे गावामध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण होऊन सर्व गावकऱ्यांमध्ये सहकाराची भावना निर्माण झालेली आहे.आज या शाळेमध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण येथील शिक्षक देत आहे. एवढेच नव्हे तर मोर्शी येथे इंग्रजीं शाळेत शिकत असलेले मुले परत येऊन गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे ही गावासाठी आणि शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
लीलाधर मासोदकर हे एक आदर्श शिक्षक असून ते शाळेमध्ये अनेक उपक्रम आणि कार्यक्रम राबवत असतात आणि मुलांमध्ये चांगले संस्कार व उत्तम शिक्षण रुजावे यासाठी धडपड करीत असतात.
गावातील मुले गावच्या शाळेतच शिकावी आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळावे .यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांचे हे शाळेतील उत्कृष्ट काम लक्षात घेऊन भांबोरा येथील ग्रामवासी यांचेकडून शाल व श्रीफळ देऊन त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आलेला आहे.