GavakadachiBatmi | किनवट पंचायत समितीची वार्षिक आम सभेला बगल देण्याची परंपरा कायम राहणार का..?

 



किनवट  : किनवट पंचायत समिती कार्यालय हे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्या मधला ग्रामीण भागाचा विकास साधणारा दुवा असून वार्षिक आमसभा हे आर्थिक वर्षात तालुक्यात झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडण्याचे व ग्रामीण भागातील नागरिकाचे गाऱ्हाणे ऐकून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्याचे हक्काचे एकमेव व्यासपीठ समजले जाते. सदर कार्यालयाशी ग्रामीण भागातील नागरिकांचा थेट संबंध येत असल्यामुळे या कार्यालयामार्फत गावातील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कामाचा आढावा व पुढील वर्षातील आराखडा मांडणी करणे अपेक्षित आहे. परंतु कोरोना काळापासून मागील काही वर्षात आम सभा घेण्यात किनवट पंचायत समितीमध्ये उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे किनवट विधानसभा मतदारसंघातील पंचायत समितीकडून गेली अनेक वर्ष झाले, आमसभा घेतलीच गेली नाही. 



शासन धोरणानुसार घेतली जाणारी आमसभा जनतेचे व्यासपीठ असून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या समक्ष जनतेच्या प्रश्नांचा निपटारा होणे, ही आमसभेची संकल्पना असते. यामुळे विशेष करून ग्रामीण जनता आम सभेची आतुरतेने वाट पाहत असते. परंतु, गेली अनेक वर्षांपासून किनवट तालुक्याची आमसभा झालेली नसल्याने आम सभा घेण्याचा पंचायत समिती कार्यालयाला विसर पडला की काय अशी नागरिकात चर्चा आहे.

किनवट तालुक्यात तहसील कार्यालय, पंचायत समिती, महिला व बालविकास विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, वीज कंपनी, एमआयडीसी आधी ठिकाणी जनतेचे, शेतकरी बांधवांचे, अपंग व दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न असून आमसभा घेतल्यास निश्चितपणे, अशा प्रश्नांची सोडवणूक होऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना झाल्याने सर्वत्र प्रशासक राज असून यावर्षी तरी आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पंचायत समितीची आमसभा होइल अशी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा आहे.


पंचायत समिती आमसभा संदर्भात गटविकास अधिकारी कांबळे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी आमसभा पदसिद्ध अध्यक्ष आमदार भीमराव केराम यांच्याशी विचारविनिमय करून आम सभेची तारीख लवकरच निश्चित करण्यात येईल असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post