जिल्हा प्रतिनिधी - पवन पाटणकर
अमरावती : ग्रामपंचायत उत्तमसरा येथील ग्रामसचिव अंबाळकर गावातील बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. कामगार शासनाच्या योजनेपासून वंचित राहत असून कामगारांना दाखले न दिल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा भारतीय दलित पँथरने जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी (ता. २२) निवेदनातून दिला.
महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ येथे बांधकाम नोंदणी कामगार म्हणून नोंद करण्यासाठी उत्तमसरा येथील बांधकाम कामगारांना ग्रामसचिवांच्या दाखल्याचे आवश्यकता आहे. कामगार दाखला मागण्याकरिता गेले असता सचिव अंबडकर ग्रामस्थांना दाखले देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व गावातील बांधकाम कामगारांना इमारत बांधकामगार असल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अन्यथा भारतीय दलित पँथर तीव्र जन आंदोलन करेल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना भारतीय दलित पँथर चे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, मनोज धुळेकर, अजय रामटेके, सचिन मेश्राम, केशव गायकवाड उपस्थित होते.

