11 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
वर्धा, मंगला भोगे : पर्यावरण पूरक पर्यटन ही काळची गरज आहे. धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा मिळावा, यासाठी इको पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. आगामी काळात इको पार्क तयार होईल तेव्हा जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेरील लोक सुध्दा येतील. जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांबरोबरच इको पार्कच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), सहकार, खनिकर्म व गृहनिर्माण, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
आमदार दत्तक ग्राम सालोड (हि.) येथे इको पार्क तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार रामदास तडस, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक हरविर सिंग, दत्ता मेघे हायर एज्यूकेशन ॲन्ड रिसर्च सेंटरचे डॉ. राजू बोरले, कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे, सरपंच अमोल कन्नाके, वास्तू विशारद किशोर चिद्दरवार, उपसरपंच आशिष कुचेवार आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले, आपण दिलेल्या आशीर्वादामुळे वर्धा-सेलू मतदारसंघा पुरते मर्यादित असलेले कार्यक्षेत्र आता संपूर्ण राज्यभर झाले आहे. आपल्या सर्वाच्या सहकार्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. मतदार संघाच्या विकासासाठी मागील काळात शासनाच्या विविध विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. सालोड मध्ये प्रत्येक योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याची धडपड केली आणि पुढेही सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून जिल्ह्याने स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची ही कर्मभूमी आहे, असे सांगून माजी खासदार रामदास तडस पुढे म्हणाले, सेवाग्राम विकास आराखडा, बोर अभयारण्य अशा जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेऊन निधी आणला] असल्याचे ते म्हणाले.
राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते 11 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. त्यामध्ये इको पार्क 2 कोटी 64 लक्ष रुपये, क वर्ग पर्यटन अंतर्गत विद्युतीकरण व सौदर्यीकरण 2 कोटी रुपये, आयुर्वेदिक कॉलेज ते सावंगी-पालोती रस्त्याकडे जाणारा रस्ता 5 कोटी 16 लक्ष, ग्रामसचिवालय ग्रामपंचायत सालोड 64 लक्ष, सालोड-नागठाणा रस्ता मजबुतीकरण 30 लक्ष, आई मंदीर ते राष्ट्रीय महामार्ग जाणार रस्ता 20 लक्ष व इंदिरा नगर सालोडकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण 30 लक्ष या कामांचा समावेश आहे.
यावेळी सालोड वासियांतर्फे व विविध संघटनांतर्फे राज्यमंत्री डॉ. भोयर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.