मूर्तिजापूर - संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थाचे अनुदान महा-डीबीटी प्रणाली द्वारे वितरीत करण्याच्या शासनाच्या सूचना असून, त्या अनुषंगाने या योजनांमधील लाभार्थ्यांनी बँक खाते आधार क्रमांकाशी व मोबाईल नंबरशी सलग्न करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले आहे. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महा-डीबीटी प्रणाली द्वारे अनुदान थेट लाभार्थांच्या खात्यात जमा करण्यात येते. बँक खाते व मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी सलग्न नसल्यास लाभार्थ्यांना लाभ प्राप्त होणार नाही, अशा सूचना शासन स्तरावर निर्गमीत झाल्या आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी या अगोदर माहिती दिलेली आहे त्या व्यतिरीक्त इतर सर्व लाभार्थ्यांनी तलाठी, महसुल सेवक (कोतवाल) यांच्याकडे अपडेट केलेले आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला, बँक पासबुक व वयाचा पुरावा तीन दिवसांच्या आत सादर करणे गरजेचे आहे. महा-डीबीटी प्रणालीमध्ये नोंद न झाल्यास लाभार्थी अनुदानापासून वंचित राहू शकतो. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी आपली माहिती तलाठी/महसुल सेवक (कोतवाल) यांना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी केले आहे.