नांदेड,किनवट - किनवटच्या पत्रकारांनी शासनाच्या गौणखनिजांची चोरी रोखवण्यासाठी ३ डिसेंबर रोजी सहायक जिल्हाधिकारी मेघना कावलींसह महसूल आयुक्तांपर्यंत पाठवलेल्या निवेदनानंतर ४ डिसेंबरच्या पहाटे प्रधानसांगवीतून एक आणि दहेगाव-आंदबोरीहून एक ट्रॅक्टर अवैध रेतीची वाहतूक करतांना पकडले. दोन्ही ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात लावलेत. रायल्टी वसूल करुन ट्रॅक्टर न सोडता शासनाच्या रेती चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद पोलीसात देण्यात यावी. ट्रॅक्टर जप्त करुन सोडण्यात येऊ नयेत, अशी पत्रकारांची पुरवणी मागणी करण्यात येत आहे.
गायरान जमिनी असुरक्षीत असून ब्लाॅस्टींग करुन अमर्याद दगडाचे उत्खनन चालू आहे. रेती/वाळू पैनगंगेसह इत्तर नदी-नाल्यातून प्रचंड उपसा आणि वाहतूक चालू असल्याचा ४ डिसेंबर रोजी बोधडीचे मंडळ अधिकारी जे.पी.गाढे, तलाठी अक्षय महाले, हरीश यादव, तलाठी भाग्यश्री तेलंगे, तलाठी अनुपमा पेंदोर यांनी धरलेले दोन ट्रॅक्टर हे पुरावा आहेत. नदी-नाल्या काठच्या शेतात साठवणूक केलेल्या ठिकाणी धाडी घालून त्या ठिकाणच्या ७/१२ वर बोझा चढवण्यात यायला हवा. धरलेले वाहाने सोडू नयेत. तर त्या वाहनांचा लिलाव करायला हवा. मुरुमाचेही उत्खनन आणि वाहतूक चालू आहे. किनवट, गोकुंदा, इस्लापूर, शिवणी, मांडवी, सारखणीसह अनेक ठिकाणी अवैध धंद्यांनी उच्चांक गाठला आहे. त्याची जबाबदारी तलाठी आणि मंडळ अधिकार्यांवर निश्चीत करुन कारवाई करा, अन्यथा पत्रकारांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. कारण त्या त्या ठिकाणच्या तलाठ्यांना या अवैध धंद्यांची पूर्ण कल्पना असल्याशिवाय धंदे फोपावत नसल्याचेही पत्रकारांचे म्हणने आहे.
ज्या ज्या सज्जातून अवैध उत्खनन होत आहे तेथिल तलाठ्यावर त्याची जबाबदारी निश्चीत करुन उत्खनन स्थळांचे पंचनामे करुन त्यांच्याकडून नुकसान भरपाई करुन घ्यावी, तरच अवैध धंद्यांना लगाम लागणार आहे. किनवट तालुका सिमेलगतच्या पैनगंगानदी पात्रातील भंडारवाडी, पिंपरी, येंदा, भूजजा-मदनापूर, गोकुंदा, कोठारी, तिनफाटा, लक्कडकोट, मारेगाव, खंबाळासह लहान-मोठ्या दाभाडी, दूधगाव, शनिवारपेठ, खेरडा, मलकापूर अशा विविध ठिकाणाहून रेतीचा उपसा आणि वाहतूक चालू आहे. मुरुमाचाही पुरवठा केला जात आहे. वर्षाकाठी केवळ ३०० ब्रासचा नाममात्र रायल्टीचा भरणा करुन बहूतांश बारमाही विटभट्या चालवल्या जातात. आपल्या कार्यकक्षेतील गायरान जमिनीची भयानक अवस्था आहे. प्लाट व्यावसायीकांनी गिळंकृत करण्यावर भर दिला आहे. कांही ठिकाणी ब्लाॅस्टींग करुन दगड काढला जात आहे. संबंधीत तलाठ्यास याची पूर्ण माहिती असतांना त्यांनी तहसिलदारांना कळवले का ? कळवले असेल तर तहसिलदारांनी वर्षभरात काय कारवाई केली ? असाही पत्रकारांचा सवाल आहे.
तलाठ्यांनी तहसिलदारांपासून जाणीवपूर्वक माहिती लपविली असावी, असा अनेकांचा संशय आहे. रेती, मुरुम, दगड शासकीय जमिनीतून चोरीला जात असेल तर ते रोखण्यात संबंधीत तलाठी आणि मंडळ अधिकार्यांनी अकार्यक्षमता दाखवली असल्यास त्यांची जबाबदारी निश्चीत करुन चोरीला समर्थन देणार्यांवर कारवाई करायला हवी.
शासनाची मालमत्ता, गौणखनिज, गायरान जमिन अबाधित ठेवण्यात कर्तव्यकसुरता केलेल्यांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा किनवटच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा ३ डिसेंबर रोजी सहायक जिल्हाधिकारी कावलींना दिल्यानंतर ४ डिसेंबर पासून धरपकड कारवाईला सुरुवात झाली आहे.