विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट : विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता वेध लागले जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचे. विभानसभा निवडणुकीत मतदारांचा ताजा मिळालेला कौल हा सार्वजनिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला वातावरण अनुकूल असल्याचे अनुमान लावला जात आहेत.
भाजपा महायुतीच्या आमदारांसमोर इच्छुकांची तोब्बा गर्दी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रदीप नाईकांसमोर विश्वासू नविन चेहरे देण्यासाठी ताकही फुंकून पिण्याची वेळ आल्याचे दिसते.
२०१७ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पाच आणि काँग्रेस एक असे पक्षीय बलाबल होते. आमदार प्रदीप नाईकांच्या काळात ही निवडणूक पार पडली. अती प्रदीर्घ कालखंडानंतर आमदार भीमराव केरामांच्या नेतृत्वाखाली २०२५ मध्ये होणार्या निवडणुकीत महायुती किती जागा जिंकणार..? आणि माजी आमदार प्रदीप नाईकांच्या नेतृत्वात काय बदल होणार होणार..? याकडे तमाम विधानसभा मतदारसंघवाशियांचे लक्ष लागणे स्वाभाविक आहे.
२०१७ मध्ये पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत वाई गटातून समाधान जाधव राष्ट्रवादी काँग्रेस, (सर्वसाधारण),
वानोळा गटातून संजय राठोड काँग्रेस (नागरीकांचा मागास प्रवर्ग),
उमरी गटातून सौ.सुनयना विशाल जाधव राष्ट्रवादी काँग्रेस (सर्व साधारण स्त्री),
मांडवी गटातून मधूकर राठोड राष्ट्रवादी काँग्रेस (सर्वसाधारण),
गोकुंदा गटातून सौ.संगिता प्रविण मॅकलवार राष्ट्रवादी काँग्रेस (नागरीकांचा मागास प्रवर्ग),
बोधडी गटातून श्रीमती सुनंदाबाई ओमप्रकाश दहिफळे राष्ट्रवादी काँग्रेस (सर्वसाधारण स्त्री),
जलधरा गटातून सौ.कमल भगवान हुरदुके भाजपा (सर्वसाधारण स्त्री),
इस्लापूर गटातून सुर्यकांत आरंडकर भाजपा (सर्वसाधारण), यांची वर्णी लागली होती.
मागच्या पक्षीय बलाबलला छेद देऊन यावेळी भाजपा महायुती इतिहास घडवणार काय..? कारण विधानसभा निवडणुकीतील मतदारांचा मूड पहाता महायुतीला अनुकूल दिसत आहे. बोधडी गटात भाजपातील इच्छुक दिग्गजांची गर्दी होणार आहे. संदीप केंद्रे, बाबूराव केंद्रे अशा अनेकांची उमेदवारी आमदारांसमोर डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारुन चालणार नाही..