जिल्हा स्वीप समितीच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन ; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला मतदानाचा संदेश

 



रॅलीला स्वीपच्या नोडल अधिका-यांनी दाखविली हिरवी झेंडी


    गावाकडची बातमी मंगला भोगे 

वर्धा दि.16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने मतदारांमध्ये मतदानाविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत आयोजित आज मतदार जाणिव जागृती बाईक रॅलीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी राहुल कर्डिले यांनी सहभागी होऊन २० नोव्हेंबरला जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असा संदेश दिला. 

 या बाईक रॅलीला स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. मंगेश घोगरे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. 

जिल्हा स्वीप समितीच्या वतीने आज दि.16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मतदार जाणिव जागृती बाईक रॅलीचे आयेाजन करण्यात आले होते. या मतदार जाणिव जागृती बाईक रॅलीमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुध्द राजुरवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, तहसिलदार संदीप पुंडेकर, स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. मंगेश घोगरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा राजु मेढे, मोटार वाहन निरिक्षक मेघल अनासाने, स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी उत्तम खरात, नायब तहसिलदार अतुल रासपायले, वैभव तिवारी, मयंक बागडे, अधिकारी व कर्मचारी, शाळेचे मुख्याद्यापक, शिक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



या बाईक रॅलीमध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्युरो वर्धाचे मल्टीमिडिया मतदार जनजागृती चित्ररथाचा समावेश होता. हा चित्ररथ नागरिकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

रॅलीचा शुभारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आला. सदर रॅली नगरपरिषद, धूनिवाला चौक, आर्वी नाका, बॅचलर रोड शास्त्री चौक मार्गे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.

बाईक रॅलीच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मतदारांनी आपल्या हक्काची जाणीव ठेवावी व लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा. युवा वर्गानी विशेषत: नवमतदारांनी जे प्रथमच मतदान करणार आहे. त्यांनी उत्साहाने मतदान करावे, असे आवाहन केले. 


 

Post a Comment

Previous Post Next Post