जातीनिहाय जनगणनेला विरोध हा शुद्ध जातीवाद आहे : जयसिंग वाघ

 




जळगाव :- भारतात जातीनिहाय जनगणना करून १९३१ ला अस्पृश्य , आदिवासी यांची सामाजिक , आर्थिक , सार्वजनिक अवस्था अतिशय मागासलेली असल्याने त्यांच्या विकासार्थ विविध उपाय योजना केल्या गेल्या . तेंव्हापासून भारतात जातीनिहाय जनगणना होवून मागास , अतिमागास जाती ठरवून त्यांच्या विकासार्थ विविध उपाय योजना केल्या जावू लागल्या , स्वतंत्र भारतात १९५१ ला जातीनिहाय जनगणना झाली व त्यास सर्वोच्य न्यायालयात आव्हान देण्यात आले व पुढची जातीनिहाय जनगणना बंद पडली . जातीनिहाय जनगणनेची मागणी देशभरातून होत असतांना सरकार त्याकडं दुर्लक्ष करून आपला जातीयवाद अधिक भक्कम करीत आहे असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.

         जळगाव येथील लालबावटा कार्यालयात ३ सप्टेंबर रोजी आयोजित जातिगत जनगणना परिषदेत अध्यक्षपदावरून भाषण करतांना वाघ बोलत होते .

       जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , आज देशातील काही धर्मांध व जात्यांध संघटना जातिनिहाय जनगणना करण्यास सक्त विरोध करत आहेत . स्वातंत्र्या नंतर अनुसूचित जाती , जमाती तसेच अन्य मागासवर्गीय समाज्याच्य कल्याणार्थ फक्त कागदोपत्री योजना आणल्या. या तीनही समजघटकांचे नेते सरकारपुढे लाळ घोटत राहिले . पर्यायाने या समाजांचा विकास कमी झाला व आतातर हा विकास खंडित होवून ते पुन्हा पूर्वीच्या व्यवस्थेकडे जात आहेत .

        परिषदेचे उदघाटन जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले . त्यांनी आपल्या भाषणात भारतात १८७१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात येत आहे मात्र २०११ पासून हे काम बंद पडले आहे . सरकार जनावरांची गणना करते मात्र माणसांची गणना करीत नाही ही अत्यंत निंदनीय बाब आहे . जातिगत जनगणना करण्यास सरकारला भाग पाडण्या करिता देशातील सर्व सरकार विरोधी संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय लढा उभारणे आवश्यक आहे . केंद्र सरकार जाती जातीत , धर्मा धर्मात संघर्ष लावून मागास , अतिमागास जातीच्या कल्याणाकडे पद्धतशीर दुर्लक्ष करीत आले आहे .

      परिषदेचे मुख्य संयोजक तथा कामगार नेते अमृत महाजन यांनी स्वतंत्र भारताच्या ७६ वर्षात सुध्दा मागास , अतिमागास , महिला यांच्यावर अन्याय - अत्याचार होत आहेत . मागास जाती , जमातीच्या योजनांचा पैसा इतरत्र वापरला जात आहे . या समाजाचे शैक्षणिक , आर्थिक मागासलेपण वाढत आहे , या समाजास हलक्या स्वरूपाची ती सुध्दा हंगामी स्वरूपाची कामे दिली जात आहेत असे स्पष्ट केले.

        डॉ. अविनाश बडगुजर यांनी जातिगत जनगणना करतांना लोकांच्या आर्थिक , सामाजिक तसेच विविध बाबींचा जसा विचार होतो तसा रक्तगटाचा सुध्दा विचार होणे आवश्यक आहे असे विचार मांडले .

     या प्रसंगी वासंती दिघे , पितांबर भारुळे , यांनीही मनोगत व्यक्त केले.

    सूत्रसंचालन भरत कोळी , स्वागत भास्कर सपकाळे , आभारप्रदर्शन जे. डी. ठाकरे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक जाधव , दीपक मगरे , गोरख वानखेडे यांनी परिश्रम घेतले . परिषदेस जिल्ह्यातून कार्यकर्ते आले होते.

   या प्रसंगी दिनांक ६ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय परिषदेला कार्यकर्ते अधिकाधिक संख्येने नेण्याचे नियोजन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post