भिवंडी (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
एक तीर एक कमान सब आदिवासी एक समान , जल- जंगल- जमीन हमारा नारा है, भारत देश हमारा है.अशा जोश पूर्ण जयघोषामध्ये जागतिक आदिवासी (मूळनिवासी) दिनानिमित्त भिवंडीतील कोंबड पाडा व आसपासच्या परिसरातील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या रॅलीचे शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन करून,अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये जागतिक आदिवासी (मूळनिवासी) दिन अत्यंत उत्साह व जल्लोषांमध्ये साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने (UNO)1994 पासून आदिवासींचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. यामध्ये समस्त आदिवासींच्या न्याय, हक्क अधिकार आणि आदिवासींचे संस्कृती जतन करून, त्यांची एकूण वेगळी ओळख, त्यांचे अस्तित्व कायम राहण्याच्या उद्देशाने, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांची उन्नती विकास आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने संपूर्ण भारतातच नव्हे तर जगामध्ये जागतिक आदिवासी (मूळनिवासी) दिन साजरा केला जात असल्याच्या धर्तीवर या रॅलीची सुरुवात राष्ट्रपुरुष व आदिवासी वीर पुरुष क्रांतिवीर बिरसा मुंडा, आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादींच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये लहान मुले व महिलांनी आदिवासी पेरावासह आदिवासी तारपा वाद्यावर नृत्याचे सुंदर असे सादरीकरण केले. यावेळी गांवदेवी मंदिर, कोलेकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोंबडपाडा, गाजेंगी हॉल ते पुन्हा गांवदेवी मंदिर अशा मार्गावरून निघालेल्या या रॅलीला आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.नागरिकांनीही या रॅलीतील आदिवासी संस्कृती, तारपा नृत्य, आदिवासी वेशभूषा इत्यादी पाहण्याचा मनमुराद आनंद अनुभवला. सदर प्रसंगी भिवंडीचे आमदार महेश चौघुले, नायब तहसीलदार दत्ता वांबळे, प्रा.संजय मुंडे, नाना झळके, दत्तू कोलेकर, लक्ष्मण शेळके, सुनील गुंड, प्रकाश तेलीवरे, विकास बाफना, दत्ता शिकारी इ.ची विशेष उपस्थिती लाभली आणि या जागतिक आदिवासी (मूळ निवासी) दिनानिमित्ताने आपआपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने कु. साक्षी जाधव हिने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि आदिवासी संस्कृती विषयी व प्रतिक लहांगे या छोट्या मुलाने उपस्थितांना सर्व आदिवासी वीर पुरुषांची नांवे व माहिती अत्यंत सुंदर पद्धतीने मोजक्या शब्दात करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील झळके यांनी केले. कार्यक्रमासंदर्भात आदिवासी तरुण कार्यकर्ते राहुल झळके यांनी सांगितले की,यंदा हे आमचे जागतिक आदिवासी (मूळ निवासी) दिन साजरा करण्याचे पहिलेच वर्ष आहे. तरीसुद्धा अनेक आदिवासी बंधू-भगिनींनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला, हे आम्हाला स्फूर्ती दायक व प्रेरणा देणारे ठरलेय, त्यामुळे आम्ही पुढील वर्षी तालुक्यातील इतर आदिवासी मुख्य कार्यकर्ते व आदिवासी बांधव यांच्याशी समन्वय ठेवून एक आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या विचारात असून,निश्चितच पुढील वर्षीच्या एकत्रितपणे सहभागासाठी आम्ही आतापासूनच प्रयत्नशील आहोत असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जाधव, राहुल झळके, मिलिंद गवे, योगेश शेळलकंदे, किशोर गवे, राकेश लहांगे, सुरेश धापसे, शैलेश भोईर, विकी जाधव, निलेश नामकोडे इत्यादी आदिवासी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. नाना झळके यांनी रॅलीच्या समारोपानंतर उपस्थित आदिवासी बंधू-भगिनी,नागरिक व विशेष सहकार्य केल्याबद्दल निजामपुरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस कर्मचारी यांचेही आभार मानले.