जामखेड : - भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७७ वर्षे झाली तरीही इथला भटका समाज भटकंती करीत आहे . शैक्षणिक , औद्योगिक , राजकीय , नोकरी या व अन्य क्षेत्रात हा समाज नगण्य स्वरूपात दिसतो या समाजातील बहुतांश लोक छोटी , मोठी शिकार करून , ओसाड जागेत निवास करतात . त्यांना स्वतःच्या मालकीचे शेत , घर नसते तेंव्हा शासनाने या समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.
जामखेड जिल्हा अहमदनगर येथील भटक्या समाजाचे नेते डॉ. अरुण जाधव यांनी ग्रामीण विकास केंद्रात आयोजित समारंभात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते . त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की , अस्पृश्य व आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३१ लाच स्टार्ट समितीतर्फे ब्रिटिश सरकारला येक अहवाल सादर केला होता . पुढं त्यांनी संविधानाच्या माध्यमातून विविध अधिकार प्रदान केले , मात्र या समाजात शिक्षणा विषयी प्रचंड उदासीनता असल्याने त्यांच्या विकासाचे मार्ग त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नाही तसेच या समाजात नेते उदयास आले नाही . शिक्षणाचा अभाव व कमालीची अंधश्रद्धा या मुळे हा समाज राष्ट्रीय प्रवाहा पासून दूर राहत आला आहे . या समाजाने अधिकाधिक शिक्षण घेवून आपल्या विकासाची साधने विकसित करावी असे आवाहन जयसिंग वाघ यांनी केले.
या समाजातील लढावू व्यक्तिमत्व तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रवकत्ये डॉ. अरुण जाधव यांनी भटका समाज आपल्या परंपरागत व्यवसायातून आता बाहेर पडत असून तो आपल्या स्वाभिमाना करिता संघर्ष करीत आहे , बाळासाहेब आंबेडकर यांनी विविध वंचित घटकास जोडण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यात हा समाज काही प्रमाणात सहभागी झाला आहे . असे विचार व्यक्त केले . डॉ. अरुण जाधव यांची वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्ये पदी निवड झाल्याने त्यांचा शाल , बुके , पुस्तक जयसिंग वाघ यांच्या हस्ते प्रदान करून जाहीर सत्कार करण्यात आला.
पोलीस उमहानिरीक्षक गौतम तायडे यांनी सामाजिक समता प्रस्थापित करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून शिका , संघटित व्हा , संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र प्रत्येकाने प्रत्यक्षात आणणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू आढाव , सूत्रसंचालन रवी शिंदे , परिचय आसाराम काळे , आभारप्रदर्शन नरसिंग भोसले यांनी केले .सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा जोतिबा फुले , शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले .
कार्यक्रमास भगवान राऊत , प्रशांत पवार , द्वारकाताई पवार , विशाल पवार , सचिन भिंगारदिवे , वैजनाथ केसकर , संतोष चव्हाण , राजू शिंदे , लता सावंत , काजोरी पवार , तुकाराम पवार , छाया भोसले आदींसह बहुसंख्य स्त्री पुरुष मोठ्यासंख्येने हजर होते .