वर्धा, : सोयाबीन या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील 2 वर्षापर्यंत वापरता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:कडील सोयाबीन बियाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबिन चालुवर्षी बियाणे म्हणुन शेतकरी वापरु शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पिक प्रात्याक्षिके योजनेंतर्गत शेतकरी समुहांकडून आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते. प्रमाणित बियाण्यांपासून वरील प्रमाणे उत्पादनातून चाळणी करुन चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. बियाणे अत्यंत नाजुक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळतांना काळजी घ्यावी.
बियाण्यांसाठी साठवणूक करतांना आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्क्यापेक्षा जास्त नसावे. साठवणूकीसाठी प्लास्टीक पोत्याचा वापर करु नये. बियाणे साठवतांना त्याची थप्पी 7 फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे हाताळतांना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावा. प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकन, वृंद वरंभा सरी पध्दतीने किंवा प्लॅन्टरचा वापर करुन पेरणी करावी.
सोयाबिनची उगवणक्षमता 70 टक्केपक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबिनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलपर्यंत करावी. पेरणीपुर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅमची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बिजप्रक्रिया करुन सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी, असे कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी कळविले आहे.