अतनूर : देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाले आहेत. त्यानिमित्त आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावातील वाडी-तांडा-वस्तीतील तसेच जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातील बांधकाम कामगारांना याचा फटका बसत आहे. बांधकाम कामगाराची नोंदणी, नूतनीकरण, लाभाचे अर्ज मंजुरी अभावी प्रलंबित असल्याने कामगारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. किमान नोंदणी व नूतनीकरण अर्ज निकाली काढावे, अशी मागणी अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस संघटना, राष्ट्रीय मजदूर संघ मराठवाडा अध्यक्ष बी.जी.शिंदे-पाटील अतनूरकर व इतर इमारत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. राष्ट्रीय मजदूर संघ मजूर कामगार संघटना लातूरचे जिल्हाध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील अतनूरकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्त तथा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ लातूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने बांधकाम व इतर कामगारांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र गेल्या काही महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कामगारांची नवीन नोंदणी, नूतनीकरण, लाभाच्या फाईली स्वाक्षरीविना धुळखात पडले आहेत. सध्या मात्र निवडणुकीचे कारण पुढे करून टाळाटाळ केली जात आहे. इतरत्र जिल्ह्यात मात्र बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या योजना पूर्वीप्रमाणे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. लातूरमध्ये या योजना पुढील प्रमाणे सुरू करून प्रलंबित सर्वच प्रकरणे निकाली काढावेत, अशी मागणी अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या वतीने राज्याचे राज्य समन्वयक तथा लातूर जिल्हा अध्यक्ष एस.जी.शिंदे-पाटील अतनूरकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. लातूर येथील कामगार आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात ? याकडे सर्व बांधकाम कामगारांचे लक्ष लागले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईच्या वांद्रा येथील मुख्य महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईचे कामगार आयुक्त, संभाजीनगरचे उपकामगार आयुक्त, लातूरचे जिल्हाधिकारी, लातूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यासह सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे राज्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष ॲड.सुनील शिंदे, राज्य समन्वयक एस.जी.शिंदे-पाटील अतनूरकर, राज्यसमन्वक प्रसन्ना देशमुख, अजय बडे, राष्ट्रीय मजदूर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बी.जी.शिंदे-पाटील अतनूरकर, लातूर जिल्हा अध्यक्ष कैलास सोमुसे-पाटील अतनूरकर यांच्याही स्वाक्षरी आहेत.