जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक;खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांची कृषी विभागाला सूचना

 


   


 अमरावती: आगामी काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. जिल्ह्यात खते, बियाणे, कृषी निविष्ठा आदींची कमतरता जाणवणार नाही, याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कृषी विभागाला दिल्या.


                जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिनेश डागा, महाउर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल तायडे, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक एस.पी. देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.        




  जिल्ह्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र 6 लाख 81 हजार हेक्टर असून, सोयाबीन, कापूस, तूर ही मुख्य पिके आहेत. गतवर्षी खरीप पिकाचे 6 लाख 76 हजार हे. पेरणी क्षेत्र होते. येत्या हंगामासाठी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारी, उडीद व मका आदी पिकांसाठी 1 लक्ष 12 हजार 125 क्विंटल बियाण्याची गरज आहे. सोयाबीन या मुख्य पिकासाठी 98 हजार 758 क्विंटल, कपाशीसाठी 7 हजार 306 क्विंटल व तुरीसाठी 6 हजार 356 क्विंटल बियाणे लागणार आहे. धारणी व चिखलदरा तालुक्यात मक्याचा पेरा जास्त असतो. त्यामुळे मक्याचे 4 हजार 980 क्विंटल बियाणे लागणार आहे. शेतकरी बांधवांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी परिपूर्ण नियोजन व कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.  


      युरिया, एसएसपी, डीएपी, संयुक्त व मिश्र खते आदी सर्व खतांसाठी 1 लक्ष 38 हजार 400 मे. टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी 60 हजार 650 मे. टन खतसाठा उपलब्ध आहे. उर्वरित अपेक्षित खतसाठा वेळेत उपलब्ध होईल यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे. कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे, घरच्या बियाण्यांचा वापर वाढविणे, उगवण क्षमता तपासणी, माती परिक्षण, ठिंबक व सूक्ष्म सिंचनाद्वारे खत वापर आदींसाठी प्रयत्न व्हावेत. खत आवंटनानुसार दरमहा पुरवठ्याचे संनियंत्रण करण्यासाठी तालुकानिहाय पथक तयार करुन संबंधितावर कारवाई करावी. नॅनो युरिया वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन नॅनो युरियाचा वापर वाढवावा, असे निर्देश सौरभ कटियार यांनी यावेळी दिले. 

 

Post a Comment

Previous Post Next Post