मतदानाच्या दिवशी(दि.26) जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद; जिल्हाधिकारी यांचे आदेश

 





            अमरावती : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने वर्धा लोकसभा मतदार संघात समाविष्ठ असलेल्या धामणगाव रेल्वे व मोर्शी मतदारसंघ तसेच अमरावती लोकसभा मतदार संघात शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी एकाच दिवशी लोकसभा निवडणूकीकरीता मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी वर्धा लोकसभा मतदार संघातील दोन व अमरावती लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील काही गावांमध्ये आठवडी बाजाराचा दिवस आहे. या आठवडी बाजाराच्या निमित्त्याने मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी होऊन मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा पोहोचू नये म्हणून संबंधित गावांतील आठवडी बाजार शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहे.


           सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्याचा मतदानाचा हक्क बजावावा याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदारांचा सहभाग वाढावा याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहे. दि. 25 एप्रिल 2024 रोजी जिल्हातील सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथक सर्व निवडणूक साहित्यासह पोहचणार असून दि. 26 एप्रिल 2024 रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निर्भय व निरपेक्ष वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रीया पार पडावी याकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वेय प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.


          स्थानिक आठवडी बाजाराच्या निमित्याने मतदान केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होवून त्याचा फायदा समाजकंटक कायदा व सुव्यवस्था बाधित करण्याचा हेतू ठेवणाऱ्या लोकांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि अमलांत असलेली निवडणूक आचारसंहिता भंग करण्याचा प्रयत्न सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदान हे निर्भय निरपेक्ष वातावरणात पार पडावे आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती शाबूत राहावी याकरिता दि. 26 एप्रिल 2024 रोजी संपुर्ण अमरावती जिल्ह्यामधील शहरी व ग्रामीण भागात भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवून दुसऱ्या दिवशी किंवा सोयीच्या इतर दिवशी बाजार भरविण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणेमार्फत करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटियार यांनी आज निर्गमित केले.

Post a Comment

Previous Post Next Post