बदलापुर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-पाश्चात्य संस्कृतीचा शालेय विद्यार्थ्यांवर झपाट्याने विपरीत परिणाम होत असताना श्री पार्थ अकॅडमीचे संस्थापक-संचालक स्वप्नील कळसकर हे अनेक विविध उपक्रम राबवून शैक्षणिक तसेच भारतीय संस्कृती जपण्याचे मोलाचे कार्य नेहमीच करत असतात.जगभर व्हॅलेन्टाइन सप्ताहचा गाजावजा व विविध डेज ची रेलचेल सुरु असताना नुकताच बदलापूर मधील पालक व विद्यार्थी यांच्याकरिता श्री पार्थ अकॅडमी या शैक्षणिक संस्थेने मातृ पितृ दिन सोहळ्याचे(Parentine Day)आयोजन केले होते.यावेळी प्राध्यापक डाॅ.दिनेश गुप्ता यांनी मोटिव्हेशन करुन विद्यार्थी आणि पालकांना या दिवसाचे महत्व पटवून दिले.या सोहळ्यासाठी दिडशेहून जास्त विद्यार्थी आणि पालकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अरुण सुरवळ,व्हाईस ऑफ मिडिया चे कोकण व मुंबई अध्यक्ष अरुण ठोंबरे,पत्रकार कमाल शेख आवर्जून उपस्थित होते.पालक व विद्यार्थी यांच्या समस्या समजावून कशाप्रकारे यशस्वी जीवनाची वाटचाल करता येईल,याबद्दल दिनेश गुप्ता यांनी मार्गदर्शन केले.
तसेच मातृ देवो भव..पितृ देव भव..या संकल्पनेने जशी गणेशाने शिव पार्वतीची प्रदक्षिणा करुन आशिर्वाद घेतला त्याच प्रमाणे उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा करुन त्यांची पूजा करून आशिर्वाद घेतला.असा दिवस दर वर्षी प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात साजरा केला जावा असे आवाहन माजी नगरसेवक अरुण सुरवळ यांनी केले.शासनाने नुकत्याच १६वर्ष पर्यंत मुलांना क्लासेस मध्ये शिक्षण घेण्यास मनाई केल्याने सर्व क्लासेस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जे शिक्षक या क्लासेसवर अवलंबून आहेत त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.त्यामुळे मिडीया आणि पालकांनी अशा जुलमी अटींना लगाम घालावा आणि शिक्षणावर आलेले संकट दूर केले जाईल यासाठी मार्ग काढावा असे भावनिक आवाहन श्री पार्थ अकॅडमी चे सर्वेसर्वा स्वप्नील कळसकर यांनी केले.