लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
अकोला : कोरोनाच्या संकटग्रस्त काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा सुरळीत ठेऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचविणार्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचार्यांचे समायोजन करून शासनाने त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व आयुक्त आरोग्य व अभियान यंत्रणा यांचेकडे केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या अकोला जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाव व काळ्या फिती लावून आंदोलन केले. त्या आंदोलन मंडपाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन या अधिकारी-कर्मचार्यांच्या भावना समजावून घेतल्या. यावेळी त्यांचेसोबत पत्रकार अंबादास तल्हार, विजयराव बाहकर व सागर लोडम उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अशा अधिकारी कर्मचार्यांचे देशातील 7 राज्यांनी समायोजन केलेले आहे. परंतू महाराष्ट्रात वारंवार मागण्या होऊन आणि न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश देऊनही शासनाने त्यांना न्याय दिलेला नाही. या अधिकारी कर्मचार्यांच्या कोरोना काळातील आरोग्यसेवेची समाजासोबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघानेही दखल घेतली आहे. त्याचप्रमाणे शासनाने त्यांना अधिक उर्जादायी आरोग्य सेवेसाठी प्रोत्साहन द्यावे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणारी आंदोलने आणि पुढील व्यापक दिशा पाहता आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, ही बाब शासनाने लक्षात घ्यावी. वाढत्या महागाईच्या काळात त्यांच्या कुटूबांचाही सहानुभूतीपूर्वक करून शासनाने त्यांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी संजय एम. देशमुख यांनी पाठविलेल्या पत्रातुन केली आहे.