श्री शिवाजी विद्यालयात लोकस्वातंत्र्यच्या शिबिरात ३०० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी
अकोला- "रक्तदान सर्वश्रेष्ठ दान" म्हटले जाते,आवाहन करतांना या वाक्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो.परंतू संकटसमयी तातडीने रक्तदान करण्याची जेव्हा गरज पडते त्यावेळी अनेक विद्यार्थी आणि समाजातील अनेकांना आपला रक्तगटच माहिती नसणे ही परिस्थिती चिंतनीय आहे.म्हणून शालेय पातळीवरून रक्तगट तपासणी अनिवार्य करण्यात आली.त्यासाठीच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आणि श्री.शिवाजी विद्यालय,हरिहर पेठ,अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेल्या या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांनी न चुकता समोर येऊन आपले रक्तगट तपासून घ्यावे. असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले.
श्री शिवाजी विद्यालय शहर शाखा अकोला येथे आयोजित रक्तगट तपासणी शिबिरात ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते. यावेळी ३०० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.जिल्हा स्त्री रूग्णालयाचे डॉ.मोहम्मद मुनीर, डॉ.पवन महल्ले व अश्विनी पळसपगार यांनी यावेळी तपासणी केली.या प्रसंगी पर्यावरण मित्र,समाजसेवी,ग्रीन ब्रिगेडचे संस्थापक- अध्यक्ष विवेकजी पारसकर हे उद्घाटक तर लोकस्वातंत्र्यचे राष्ट्रीय उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे, मार्गदर्शक पदाधिकारी व शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, अंबादास तल्हार,अशोककुमार पंड्या व विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. विवेक पारसकर यांनी यावेळी पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करीत वृक्षारोपणाच्याही कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत ग्रीन ब्रिगेडच्या पर्यावरण संरक्षण आणि वृक्ष लागवडीची माहिती दिली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी केले तर संचालन कु. वाकोडे मॅडम व आभार प्रदर्शन नेमाडे मॅडम यांनी केले. रक्तगट तपासणी करिता सर्वोपचार रुग्णालयाची चमू उपस्थित होती.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.