भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास दि.14 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ, विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन









महाराष्ट्र : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी ठराविक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. 

सदर योजनेसाठी सन २०२२-२३मधील अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना दिनांक 14 जुलै २०२३ पर्यंत स्वाधार योजनेचे अर्ज सादर करता येणार आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांचे सन 2022-23 मधील अर्ज दि.31 मार्च, 2023 पर्यंत क्षेत्रीय स्तरावर स्विकारण्यात आलेले आहे. तथापि, क्षेत्रीय कार्यालये, विविध संघटना, पालक, विद्यार्थी यांचेमार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विद्यार्थी वंचित राहु नये, यासाठी सदर योजनेअंतर्गत सन 2022-23 मधील विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याची मुदत आता दिनांक 14 जुलै, 2023 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी 5 किंमी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 10 वी/ 12 वी/ पदवी/ पदविका परीक्षेमध्ये 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना 3 टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील. 

सन 2022-23 मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.14 जुलै 23 पर्यंत संबंधित जिल्ह्याचे सहाय्य आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे परीपूर्ण अर्ज सादर करावेत. असे आवाहन श्री.सुनिल वारे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग अमरावती यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post