भद्रावती, विशेष प्रतिनिधी अमृत कुचनकर- ‘जावई माझा भला नव्हे चोर’ या वाक्याचा प्रत्यय माजरीतील एका सासूला आला आहे. मुख्य म्हणजे सासरचे कुणीच घरी नसताना जावयानं हा प्रताप केला. दरम्यान जावयाने सासरच्या घरातील दागिन्यांवर हात साफ केला. माजरीमध्ये घडलेल्या या प्रकाराने सासुही चकीत झाली. दरम्यान बुधवारी दुपारी ४ वाजता याबाबत माजरी पोलिसांना कळवण्यात आल. जावयाकडून चोरीचे दागिने हस्तगत करण्यात माजरी पोलिसांना यश आले आहे. चोरी करणाऱ्या जावयाचे नाव विशाल शुक्रचार्य वनकर (३५) असे आहे.
सासू विदिशा सुकराज रामटेके (६१) आंबेडकर वार्ड येथे वास्तव्यास असून त्यांचे पती सुकराज रामटेके यांचे २६ मे रोजी निधन झाले होते. सासरे सुकराज रामटेके यांच्या निधनानंतर जावई विशाल वनकर हे आपल्या सासूरवाडी आला. दरम्यान सासू काही दिवसांनंतर गावाला गेली. सासू गावाला गेल्याचे समजताच जावईने घरी कोणी नसल्याचे संधी साधून सासूच्या घरातील चांदीचे व सोन्याचे दागिन्यांवर हात साफ केला.
सासूच्या तक्रारीवरून पोहेकॉ प्रदीप पाटील व पोशि सुरज अवताडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यावेळेस त्यांना समजून आले की, ही चोरी कुणीतरी ओळखीतीलच व्यक्तींनी केली. दरम्यान पोलिसांच्या तपासात सासऱ्याच्या निधनानंतर जावई विशाल वनकर सासूकडे येवून मुक्कामी राहायला लागला असं समजून आले. दरम्यान पोलिसांनी विशाल वनकर याला विचारपूस केली असता त्याचे वर्तन संशयस्पद दिसून आल्याने त्याला ताब्यात घेवून कसून चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान विशाल वनकर याने सासूचे दागिने चोरी केल्याचे कबूल केल्याने त्याचेकडून ३८० ग्रॅम चांदी आणि २ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या दागिने तक्रारदार विदिशा रामटेके यांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ प्रदीप पाटील, हरिदास चोपणे, पोशि सूरज अवताडे यांनी केली आहे.